कोरोनामुळे श्रीलंका अडचणीत

आशिया कप स्पर्धेला एक आठवडय़ापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना यजमान श्रीलंकेच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेवर कोरोनाचे सावट निर्माण झाले असून, यजमान श्रीलंकेचा संघ अडचणीत सापडला आहे.

येत्या 30 ऑगस्टपासून आशिया चषक 2023 स्पर्धेचे बिगुल वाजणार आहे. यंदाच्या वर्षी ही स्पर्धा हायब्रिड प्रकारात खेळवली जाणार असून श्रीलंका आणि पाकिस्तान यांना स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे. स्पर्धा अवघ्या पाच ते सहा दिवसांवर येऊन ठेपलेली असताना श्रीलंकेच्या संघातील सलामीवीर आणि यष्टिरक्षक फलंदाजाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

गतवर्षीचे आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद श्रीलंकेने पटकावले होते. यंदाच्या स्पर्धेसाठी लंकेने संभाव्य संघ जाहीर केला असून यष्टिरक्षक कुसल परेरा हा राष्ट्रीय संघात परतला असल्याने लंकेची वरची फळी मजब्तू झाली आहे. यंदाच्या वर्षीचा आशिया चषक घरच्या मैदानावर होत असल्याने श्रीलंकेची बाजू मजबूत असणार आहे. श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धेत सहावेळा विजेतेपद पटकावले आहे. पहिल्यांदा 1986 मध्ये आशिया कप जिंकला होता. 1986 मध्ये श्रीलंका हा आशिया कपचे यजमानपद स्वीकारणारा पहिला देश होता.