
राज्यात कोरोना वाढल्यामुळे लॉकडाऊनसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्याचे आव्हान शालेय शिक्षण विभाग आणि राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासमोर उभे राहिले आहे. कोरोनाचा वाढला तर दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकतात किंवा रद्द होऊ शकतात याविषयी सध्या अंदाज बांधणे कठीण असून परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात अशी अपेक्षा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
दहावी, बारावी परीक्षेसंदर्भात शुक्रवारी शिक्षक व पालक प्रतिनिधींसोबत शालेय शिक्षणमंत्र्यांची बैठक पार पडली. परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांची संख्या पाहता परीक्षा ऑफलाइनच पार पडतील असे वर्षा गायकवाड यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. या बैठकीला अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील, विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर टेमकर, उपसंचालक विकास गरड, पालक प्रतिनिधी ऍड. अनुभा सहाय, सुनील चौधरी आदी उपस्थित होते. परीक्षांच्या नियोजनासाठी शिक्षण मंडळ एसओपी तयार करणार असून यात पालक प्रतिनिधींनी सुचविलेल्या सूचनांचा विचार केला जाईल. तसेच या वर्षीच्या परीक्षा अभूतपूर्व परिस्थितीमध्ये होत असून पालक संघटना व शिक्षकांनी शिक्षण विभागासोबत एकत्र येऊन काम करावे, असे आवाहनही यावेळी वर्षा गायकवाड यांनी केले.
विद्यार्थीकेंद्री परीक्षा
z भौतिकशास्त्र्ा, रसायनशास्त्र्ा, गणित या परीक्षांमध्ये पुरेसे अंतर राखणार. z कोरोनामुळे विद्यार्थ्याला तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा देता न आल्यास अशा विद्यार्थ्यांना लेखा परीक्षेनंतर संधी मिळणार; त्यासाठी वेगळे परीक्षा शुल्क आकारणार नाही. z सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणाऱया तासिका वाढविणार; विद्यार्थ्यांना लवकरच प्रश्नसंच उपलब्ध होणार. z विद्यार्थी शिकत असलेल्या शाळा-कॉलेजमध्येच परीक्षा केंद्र उपलब्ध होणार.
देशपातळीवर एकच परीक्षा धोरण राबवा
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यांत दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. काही राज्यांत परीक्षा रद्द केल्या आहेत, तर काही राज्यांनी ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा गोंधळ सोडविण्यासाठी केंद्र सरकारने देशपातळीवर दहावी, बारावी परीक्षांसाठी एकच धोरण ठरवावे, अशी मागणी इंडिया वाईड पेरेंट्स असोसिएशनच्या ऍड. अनुभा सहाय यांनी केली आहे.





























































