पाटोदा पंचायत समितीत कर्मचारी गैरहजर; माजी सभापतींनी लावले कार्यालयाला टाळे

पाटोदा येथील दांडी बहाद्दर प्रशासकीय कर्मचाऱ्यांची चर्चा नेहमी सुरू असते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पाटोदा पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी वेळेत उपस्थित राहत नसल्याने नागरिकांच्या कामाचा खोळंबा होत आहे. या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सूचना देऊनही कर्मचारी वेळेत उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे पाटोदा पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य पुष्पाताई सोनवणे यांनी आक्रमक प्रवित्रा घेत शुक्रवारी पंचायत समिती कार्यालयास टाळे ठोकले. तसेच पंचासमोर गैरहजर कर्मचाऱ्यांचा पंचनामा करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

मागील काही दिवसापासून कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. या संकटकाळात कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीविषयी काही नियम करण्यात आले होते. मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर नियमामध्ये काही बद्दल करण्यात आले. त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 पर्यंत कार्यालयात उपस्थित राहण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असताना पंचायत समितीच्या कयर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कामांसाठी पंचायत समितीमध्ये येणाऱ्या नागरिकांची अडचण होत होती. याबाबत पंचायत समितीच्या माजी सभापती पुष्पाताई सोनवणे यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर सोनवणे यांनी कर्मचाऱ्यांना वेळेत हजर राहण्याची सूचना केली होती. मात्र, त्याकडे कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष करत मनमानी सुरुच ठेवली. त्यामुळे सोनवणे शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात पाहणीसाठी आल्या. त्यावेळी बहुतांश कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलुप लावले. रीतसर पंचासमोर पंचनामा करुन वेळेत हजर न राहणारे कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवभुषण जाधव,सामाजिक कार्यकर्ते अबलुक घुगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या