
शहरातील कचऱयाचे संकलन करून त्याची कचरा डेपोपर्यंत वाहतूक करण्याच्या निविदेला महापालिकेच्या स्थायी समितीने सोमवारी मंजुरी दिली आहे. घरोघरी जाऊन कचऱयाचे संकलन ठेकेदार संस्थेमार्फत केले जाणार असून, पुढील महिनाभरात शहरातील सर्व कचरा गोळा करून स्वच्छ शहर ठेवण्याची अट या संस्थेस घालण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध रस्त्यांच्या कामांसही सभेने मंजुरी दिली आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी (दि. 6) सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत शहरातील कचरा संकलन व वाहतुकीची अहमदाबाद येथील श्रीजी एजन्सीची निविदा मंजूर करण्यात आली आहे. निविदा मंजुरीसाठी विविध अटी घालण्यात आल्या आहेत. पहिल्या वर्षी 2550 रुपये प्रतिटन, दुसऱया वर्षी 2150 रुपये प्रतिटन, तिसऱया वर्षी 2250 रुपये प्रतिटन याप्रमाणे दर निश्चित करण्यात आले आहेत. प्रतिदिन प्रत्येक नागरिकाच्या घरी जाऊन कचरा संकलन करायचे आहे. शहरात विविध ठिकाणी पडलेला कचरा अथवा नागरिकांनी आणून टाकलेला कचरा तत्काळ उचलण्यात येणार आहे. त्यासाठी ठेकेदार संस्थेला महापालिका 64 गाडय़ा भाडय़ाने देणार असून, ठेकेदार संस्थेच्या स्वतःच्या 30 गाडय़ा असणार आहेत.
शहरात पूर्वी 10 ते 12 हजार पथदिवे होते. सध्या शहरात 35 हजार दिवे बसविण्यात आले असून, त्यामुळे सुमारे 70 टक्क्यांपर्यंत विजेची बचत झाल्याची माहिती उपायुक्त यशवंत डांगे यांनी सभेत दिली. त्याचबरोबर शहरातील विविध रस्त्यांच्या कामांना स्थायी समितीने मंजुरी दिली
आहे. त्यामुळे खराब रस्त्यांमुळे नागरिकांची होणारी गैरसोय लवकरच दूर होणार आहे. महापालिकेतील मानधनावर काम करणाऱया विविध पदांवरील कर्मचाऱयांच्या नियुक्त्यांना यावेळी मंजुरी देण्यात आली.
सभेला सभापती वाकळे यांच्यासह सदस्य विनित पाऊलबुद्धे, गणेश कवडे, रुपाली वारे, ज्योती गाडे, गौरी नन्नवरे, राहुल कांबळे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, श्रीनिवास कुऱहे, तडवी आदींसह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


























































