भर चौकात …वास्तवात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुर्गेश आखाडे । रत्नागिरी

अन्यायाविरूध्द लढणारी पिडीत तरूणी, तरूणीचा आवाज दाबणारे राजकीय पुढारी असं ज्वलंत वास्तववादी चित्र संकल्प कलामंचने ‘भर चौकात गांधी पुतळ्यासमोर’ या प्रायोगिक नाटकातून राज्य नाट्य स्पर्धेच्या रंगमंचावर मांडले.

लेखक राजेंद्र पोळ यांचे ‘भर चौकात गांधी पुतळ्यासमोर’ हे वास्तववादी नाटक आहे. अनेक नाटकांच्या शेवटी सत्याचा विजय होतो असं आपण पहातो. प्रत्यक्षात खऱ्या आयुष्यात सत्याच्या बाजूने लढणारे सगळेच जिंकतात असे नाही. अन्यायाविरूध्द लढणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जाते प्रसंगी त्याव्यक्तीला जीवानिशी संपवले जाते. भर चौकात गांधी पुतळ्यासमोर ही हेच घडतं. एका तरूणीवर श्रीमंत बापाची औलाद बलात्कार करते. बलात्कारीत मुलगी अपराध्याला शिक्षा व्हावी म्हणून संघर्ष करते. त्या मुलाचा श्रीमंत काका आणि त्याच गावातील पालकमंत्री हे प्रकरण दाबून टाकतात. आपण अपराध केला याची जाणीव असलेला तो तरूण त्या पिडीत तरूणी समोर आपलं प्रेम व्यक्त करतो आणि तो ही लढाई प्रेमावरच जिंकतो. मात्र ती मुलगी खालच्या जातीतील आहे म्हणून मुलाच्या काकाचा विरोध कायम राहातो आणि अखेर त्या तरूणीचा खून केला जातो. गांधी पुतळ्यासमोरच सत्यासाठी लढणाऱ्या तरूणीचा खून होतो. त्या तरूणीने आत्महत्या केली असं भासवलं जातं, अशी उपरोधिक रचना या नाटकात आहे.

दबावाखाली वावरणारे पोलीस, प्रकरण दाबणारे राजकारणी, आयत्या वेळी माघार घेणाऱ्या सामाजिक संघटना, महसूलमंत्री आणि पालकमंत्री यांच्यातील शह-काटशह, आवडत असलेल्या मुलीवर बलात्कार करून मग आपलं प्रेम मांडणारा तरूण, अशा अनेक विषयांबाबत गुंता दिग्दर्शक गणेश गुळवणी यांनी उत्तम सोडवला आहे. स्वत:च्या गावात घटना घडली त्याचा फटका आपल्या खुर्चीला बसेल म्हणून प्रकरण दाबण्याचा आटापिटा करणारा मुत्सुद्दी पालकमंत्र्याची भूमिका गणेश गुळवणी यांनी उत्तम साकारताना दिग्दर्शन आणि अभिनय अशी दुहेरी जबाबदारी सांभाळलीय. संवेदनशील विषय शासकीय विश्रामगृहावर हाताळणारे पालकमंत्री आणि त्यांच्या बातम्या बाहेर फोडणारा त्यांचा स्वीय सहाय्यक थोडे गंमतीदार होते.

अन्यायाविरूध्द आवाज उठविणाऱ्या मोहिनीची भूमिका सरस्वती संकेश्वरी हिने उत्तम साकारलीय पण या लढ्यात तिचे घरचे कुणीच दिसतं नाहीत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ती आणि मैत्रीण सोडून गेल्यावर ती एकटी पडते. सरस्वती संकेश्वरीने आपल्या भूमिकेत लढाऊपणा निश्चितच दाखवलाय. तिला साथ देणारी मयुरा मालपेकर, पूजा जोशी यांनी उत्तम वठवली. नाटकात भाव खाऊन गेले ते महिपतराव. नकारात्मक भूमिका कृष्णकांत साळवीनी आपल्या अभिनयाच्या ताकदीवर सादर करताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संवादफेकी बरोबरच त्यांची एन्ट्री आणि एक्सिट अप्रतिम होती. अभिनयाची उत्तम जाण असलेले चंद्रकांत कांबळे वकीलाच्या भूमिकेत शोभून दिसले. दबावात काम करणारा पोलीस इन्स्पेक्टर अमोल पाटीलने वाट्याला आलेली भूमिका उत्तम सांभाळली. राजकीय दबावाच्या व्यतिरिक्त त्याला कुठे पोलीसी खाक्या दाखवायची संधीच नव्हती. मंजिरीच्या भूमिकेत पूनम पोटफोडेने चमक दाखवली. मैत्रीणीच्या लढ्यात साथ देणारी पूनमला मोहिनी आत्महत्या करणार नाही याची खात्री ती शेवटच्या प्रसंगात अभिनयातून सांगताना मोहिनीच्या मृत्यूचे दु:ख तीने अभिनयातून मांडलंय. नाटकाचा नायक मुरलीच्या भूमिकेत गिरीश शितप याने अभिनयाचे पैलू दाखवले आहेत. बलात्कारानंतर कबुली देणारा, पिडीत महिलेवरचे प्रेम व्यक्त करत शिक्षा भोगायला तयार होणारा, महिपतराव त्याला सोडविण्याचा प्रयत्न करत असले तरी त्याला कठोर विरोध करणारा, अखेरच्या क्षणी तरूणीला प्रेमाने जिंकणारा आणि शेवटच्या प्रसंगात तीचा मृतदेह पाहून खूनाचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याचा आवाज देणारा नाटकाचा तडफदार नायक दिसून आला. नाटकांचा पडदा पडला तरी तरूणींला न्याय देण्याकरीता नाटकाच्या पार्ट -२ साठी पुढे खूप वाव आहे. भूमिका आणि कलाकारांची उत्तम निवड ही नाटकाची जमेची बाजू आहे. सत्यविजय शिवलकर, प्रसाद पवार, सुशील कांबळे, भूषण बागुल, मनाली मिराशी यांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या. नंदकुमार भारती आणि रवींद्र साळुंखे यांचे प्रातिनिधिक नेपथ्य आणि रंगमंचाचा तो काळा रंग ‘काळंबैर’ करणाऱ्याचं वास्तव सांगत होता. प्रकाश ठिक यांची रंगभूषा आणि ज्ञानेश्वर पाटील यांची वेशभूषा उत्तम होती. विनोद वायंगणकर, गजानन गुरव आणि डॉ. दिलीप पाखरे यांची निर्मिती असलेले हे नाटक सामाजिक, राजकीय परिस्थितीवर उत्तम भाष्य करते.