स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणावरून मिंधे सरकारमध्ये रुसवेफुगवे ; हंगामी पालकमंत्री ठरवून झेंडावंदन उरकण्याचे धोरण

mantralay

स्वातंत्र्यदिनी जिल्हा मुख्यालयांमध्ये ध्वजारोहणाचा मान पालकमंत्र्यांचा असतो. परंतु एक वर्षे झाले तरीही मिंधे सरकारने राज्यातील 17 जिह्यांमध्ये पालकमंत्री अद्याप नेमलेले नाहीत. त्यातच स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोण करणार यावरून मिंधे सरकारमध्ये रुसवेफुगवे दिसून येत आहेत. त्यामुळे हंगामी पालकमंत्री नेमून ध्वजारोहण उरकण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे.

राज्यात 36 जिल्हे आहेत. 19 जिह्यांमध्ये पालकमंत्री नेमण्यात आले आहेत. 17 जिह्यांना अजूनही पालकमंत्र्याची प्रतीक्षा आहे. मिंधे सरकारमध्ये समावेश असलेल्या भाजप, मिंधे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये पालकमंत्री पदासाठी चढाओढ लागली आहे. ठरावीक जिह्यांचेच पालकमंत्रीपद पाहिजे म्हणून त्यांनी हट्ट धरला आहे. त्यामुळे ध्वजारोहणाची यादी दोन वेळा बदलण्याची नामुष्की मिंधे सरकारवर आली. काही जिह्यांना पालकमंत्रीच नसल्याने तात्पुरते पालकमंत्री ठरवून ध्वजारोहण उरकण्याचे धोरण सरकारने आखले आहे. त्या हंगामी पालकमंत्र्यांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री मुंबईत करणार ध्वजारोहण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथे ध्वजारोहण करणार आहेत.

ध्वजारोहणासाठी इतर मंत्र्यांवरील जबाबदारी
अमरावती – छगन भुजबळ, चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार, वाशीम – दिलीप वळसे-पाटील, नगर – राधाकृष्ण विखे-पाटील, जळगाव – गुलाबराव पाटील, ठाणे – रवींद्र चव्हाण, सिंधुदुर्ग – दीपक केसरकर, रत्नागिरी – उदय सामंत, परभणी – अतुल सावे, छत्रपती संभाजीनगर – संदीपान भुमरे, सांगली – सुरेश खाडे, नंदुरबार- विजयकुमार गावीत, धाराशीव – तानाजी सावंत, सातारा – शंभुराज देसाई, जालना – अब्दुल सत्तार, यवतमाळ – संजय राठोड, बीड – धनंजय मुंडे, गडचिरोली – धर्मराव अत्राम, मुंबई उपनगर – मंगल प्रभात लोढा, लातूर – संजय बनसोडे, बुलढाणा – अनिल पाटील तर हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, अकोला आणि नांदेडमध्ये जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे.

चंद्रकांतदादा पुण्याऐवजी रायगडात तर अजितदादा कोल्हापुरात

पुणे जिह्याचे पालकमंत्रीपद भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. मात्र पुण्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हवे आहे. दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असलेले मिंधे गटाचे आमदार भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना पालकमंत्रीपद देऊ नये, असाही आग्रह धरला आहे. त्यामुळे तिथे जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते ध्वजारोहण करावे, असे आधी मिंधे सरकारने ठरवले होते. परंतु यादीत बदल करून किंबहुना अजितदादांचीही मर्जी राखण्यासाठी चंद्रकांत पाटील यांना रायगडमध्ये झेंडावंदन करण्यासाठी पाठवण्यात आले होते. पण रात्री उशिरा पुन्हा त्यांच्याकडे पुण्याची जबाबदारी सोपवली गेली. अजित पवार यांना ध्वजारोहणासाठी कोल्हापूरचे हंगामी पालकमंत्री बनवण्यात आले आहे, तर आदिती तटकरेंना पालघर जिल्हा सोपवण्यात आला आहे. जळगाव जिह्याच्या पालकमंत्रीपदासाठी गिरीश महाजन आग्रही आहेत. तिथे गुलाबराव पाटील पालकमंत्री आहेत. त्यामुळे महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री करण्यात आले आहे आणि नाशिकचे पालकमंत्री असलेले दादा भुसे यांना धुळ्यातील ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे. नाशिक जिह्याच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आग्रही आहेत. मात्र भुजबळ यांना ध्वजारोहणासाठी अमरावतीला पाठवण्यात आले आहे. कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदासाठी हसन मुश्रीफ इच्छुक आहेत; मात्र त्यांना सोलापूरची जबाबदारी देण्यात आली आहे.