सहआरोपींना वाचवण्यासाठी मिंधेंचा पोलिसांवर दबाव; मॉरिसचा साथीदार मेहुल पारीखवर कारवाई का नाही?

सत्य बाहेर येऊ नये म्हणून शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येत सहभागी असलेल्या सहआरोपींना वाचवण्यासाठी मिंधे गटाकडून मुंबई पोलिसांवर दबाव आणण्यात येत आहे. अभिषेक यांचा मारेकरी मॉरीस नरोन्हा याचा साथीदार मेहुल पारीख हा हल्ल्याच्या वेळी घटनास्थळी हजर असतानाही पोलिसांनी त्याच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

अभिषेक घोसाळकर यांच्यावर मागच्या गुरुवारी हल्ला झाला. त्या वेळी आपण घटनास्थळी हजर नव्हतो, आपली आई आजारी असल्याने मी रुग्णालयात तिच्या सोबत होतो, असा दावा मेहुलने प्रसार माध्यमांशी बोलताना केला होता. परंतु घटनास्थळाचे सीसी टीव्ही फुटेज हाती लागल्यानंतर मेहुल हा मॉरिस नरोन्हाच्या कार्यालयाच्या बाहेर ये-जा करताना स्पष्टपणे दिसत आहे. मग मेहुलला आपण घटनास्थळी हजर नव्हतो असे खोटे बोलण्याची काय गरज होती? मेहुलला पोलीस का ‘प्रोटेक्ट’ करीत आहेत, असा सवाल करण्यात येत आहे. मेहुल सीसी टीव्ही फुटेजमध्ये संशयास्पदरीत्या दिसल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अटकेची तयारीही केली. परंतु गृहमंत्रालयातून चव्रे फिरल्याने मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकाऱयांनी आपल्या तपासाची दिशा बदलली. मेहुल व अगदी ज्याचे रिव्हॉल्व्हर हत्येसाठी वापरले गेले तो मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा हाही निरपराध असल्याचा दावा पोलीस करू लागले आहेत. त्यामुळे अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही सरकारमान्य आहे की काय? असाही सवाल करण्यात येत आहे.

मॉरिस हा बलात्कार व फसवणूक प्रकरणी जेलमध्ये अनेक महिने होता. अभिषेक घोसाळकर यांनी आपणास गुंतविले असा त्याचा समज झाल्याने त्याने हे घृणास्पद कृत्य केले, असे सांगण्यात येते. परंतु त्यात तितकेसे तथ्य वाटत नाही, असे सांगताना एक स्थानिक राजकीय नेता म्हणाला, हे प्रकरण मॉरिसपुरते मर्यादित नाही. अभिषेक घोसाळकर यांचे आपल्या मतदारसंघात अफाट सामाजिक कार्य होते. त्यामुळे येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अभिषेक घोसाळकर सत्ताधाऱयांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार होता. अभिषेक घोसाळकर यांच्याकडे असलेल्या जनाधाराचा सत्ताधाऱयांना मोठा फटका बसणार होता. त्यामुळेच कटकारस्थान करून व मॉरिसला भडकावून अभिषेकची हत्या घडवून आणण्यात आली असावी व त्यात मेहुल पारीखचा सहभाग असण्याची शक्यता आहे, मॉरिसची आत्महत्या हेही एक गुढ आहे. अभिषेक व मॉरिसला तिसऱया कुणा व्यक्तीने गोळय़ा घातल्या का अशीही शंका व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी मेहुल पारीखची कसून चौकशी करणे गरजेचे आहे, असेही या नेत्याने दै. ‘सामना’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

वीजपुरवठा खंडित का?
मेहुल हा मॉरिसचा अत्यंत जवळचा जिवलग मित्र. अभिषेक घोसाळकर यांच्या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात मॉरिस हा मेहुलचा वारंवार उल्लेख करीत आहे. ‘मेहुल हमारे साथ में है।’ असेही तो बोलत आहे. तरीही मेहुल आपण तेथे नसल्याचे नाकारत असून यामागे मोठे षड्यंत्र असल्याचे सांगण्यात येत आहे. सायंकाळी 7 ते 8 या वेळात मॉरिसच्या कार्यालयातील वीज खंडित करण्यात आली होती याचेही गूढ वाढले आहे. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या ‘रिमांड’ अर्जात तसा उल्लेखही केला आहे.