राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खोखो स्पर्धा – कुमारांमध्ये ठाणे-पुणे जेतेपदासाठी झुंजणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

48व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेतील कुमार गटात ठाणे विरुद्ध पुणे, तर मुलींमध्ये धाराशीव विरुद्ध नाशिक असे अंतिम सामने होणार आहेत. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनच्या वतीने धाटाव (ता. रोहा) येथे ही स्पर्धा सुरू आहे.

मुलींच्या उपांत्य सामन्यात धाराशीवने ठाण्यावर 10-9 अशी 8.20 मि. राखून एक गुणाने दणदणीत मात केली. धाराशीवच्या अश्विनी शिंदे (4, 3.30 मि. संरक्षण व 4 गुण), सुहानी धोत्रे (1.20 मि. संरक्षण व 3 गुण ) तन्वी भोसले (1.50, 3.30 मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ करत मोठा विजय मिळवून दिला. ठाणेच्या दिव्या गायकवाड (1.30 मि. संरक्षण व 1 गुण), पायल भांगे (1.20 मि. व 2 गुण) यांनी जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला पण त्यांना इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही.

सांगलीची निकराची लढत, नाशिकचा निसटता विजय

मुलींच्या दुसऱया उपांत्य सामन्यात नाशिकने सांगलीवर चुरशीच्या सामन्यात 13-12 (मध्यंतर 7-6) असा एक गुणाने निसटता विजय मिळवला. मध्यंतराला घेतलेली एक गुणाची आघाडीच नाशिकला तारुण गेली. नाशिकर्ते सोनाली पवार , निशा विजल, दीदी ठाकरे, वृषाली भोमे (6 गुण) यांनी जोरदार खेळाचे प्रदर्शन करत सांगली वर मात केली. त्यामुळे अंतिम सामन्यात पोचण्याचे सांगलीचे स्वप्न अपूर्ण राहीले. सांगलीकडून प्रगती कर्नाळे, सानिया निकम, प्रतीक्षा बिराजदार यांनी दिलेली निकराची लढत अपुरी पडली.

पुण्याने उडवला नगरचा धुव्वा

कुमारांच्या उपांत्य सामन्यात पुण्याने नगरचा 14-10 असा एक डाव 4 गुणांनी धुव्वा उडवला. पुणे संघाने नावाला साजेसा खेळ केला. पुण्याकडून विनायक शिंगाडे (2.30, 3.10 मि. संरक्षण व 1 गुण ), विवेक ब्राह्मणे (2 मि. संरक्षण व 2 गुण), आकाश गायकवाड (1.20, 1.30 मि. संरक्षण व 2 गुण ), देवांग गादेकर (2, 2 मि. संरक्षण व 2 गुण ) यांनी उत्कृष्ट खेळ करत नगरच्या खेळाडूंना संधी दिली नाही. नगरकडून अथर्व निकम (1 मि. संरक्षण व 2 गुण ), शिवम नामदले (1.20 मि. संरक्षण ) यांनी चांगला खेळ केला.

ठाण्याने केला धाराशीवचा पराभव

कुमारांचा दुसरा उपांत्य सामना ठाणे विरुद्ध धाराशीव हा प्रेक्षणीय झाला. ठाण्याने धाराशीवचा 19-15 (मध्यंतर 11-9) असा 4 गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत स्थान पटकवलं. दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये आक्रमण आणि संरक्षण यांचा उत्तम ताळमेळ पाहायला मिळाला. ठाण्याचा मयुरेश मोरे, सुरज झोरे, रुपेश कोंढाळकर, वैभव मोरे यांनी महत्वाची भूमिका बजावली. पहिल्या डावात धाराशीव संघाने ठाण्याला चांगलेच झुंजवले. मात्र दुसऱया डावात ठाण्याने सावरले. धाराशीवकडून किरण वसावे, श्रीशंभो पेठे, रवी वसावे यांनी चांगली कामगिरी केली.