राज्यातील पावणेतीन लाख जलस्रोतांची होणार पाणी तपासणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्रामीण भागात पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या जलस्रोतांची वर्षातून दोनदा तपासणी होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पाणी विभागाकडून एप्रिलपासून दोन महिने राज्यात जलस्रोत पाणीतपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. राज्यात 2 लाख 70 हजार जलस्रोतांच्या पाण्यातील आठ घटक तपासले जाणार आहेत. त्यानंतर पाण्यातील घटकांच्या कमी-जास्त प्रमाणानुसार उपाययोजना केल्या जाणार आहेत.

ग्रामीण भागात पिण्यासाठी विहिरी, हातपंप, विंधन विहिरी पिण्यासाठी वापरल्या जातात. बहुतांश गावांत अजूनही पाणी शुद्धीकरण यंत्रणा नाही. पिण्याच्या पाण्यातील घटकांचे प्रमाण कमी-जास्त असले, तर त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. दर महिन्याला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, याची तपासणी केली जाते, तर पाणी व स्वच्छता विभागामार्फत पावसाळ्याआधी व पावसाळ्यानंतर पाण्यातील आठ घटकांची तपासणी केली जाते. पाण्यातील विविध घटक तपासणीसाठी नगर जिल्ह्यात नगर (केडगाव), कर्जत, पाथर्डी, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या तपासणी प्रयोगशाळा आहेत.

राज्यात पिण्याचे पाणी वापरले जात असलेल्या जलस्रोतांमधील पाण्याची तपासणी मोहीम एप्रिलपासून सुरू होत असून, ती 31 मेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यासाठी जलमित्रांमार्फत पाणी नमुने गोळा केले जात आहेत. त्यासाठी यंदा पहिल्यांदाच याचा वापर केला जात आहे. पाणी भरतानाचे फोटो अपलोड केले जाणार असल्याने पाणी प्रत्यक्ष जलस्रोतांवरील पाणी भरल्याचा पुरावे उपलब्ध होतील.

अशी होणार तपासणी

राज्यात तपासल्या जाणाऱ्या 2 लाख 70 हजार जलस्रोतांत चंद्रपूर जिह्यात सर्वाधिक 14 हजार 971, सोलापुरात 13 हजार 426, गडचिरोलीत 15 हजार 338, नगरमध्ये 10 हजार 326, नांदेडला 11 हजार 290 तपासणी केली जाणारे जलस्रोत आहेत. बागायती पट्टा, नदीकाठच्या भागातील पिण्याच्या पाण्यात क्षाराचे प्रमाण अधिक आढळत आहे. काही भागांतील पाण्यात फ्लोराईड, नायट्रेटचेही प्रमाण आढळून येते.

हे घटक तपासणार

फ्लोराईड, नायट्रेट, आयर्न, अल्कनेटी, पीएच, टीडीएस (क्षार), क्लोराईड, टर्ब्युटिटी (पाण्यातील गढूळपणा)