चर्चगेट – विरार एसी लोकलवर दगडफेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या जलद एसी लोकलवर कांदिवलीनजीक दगडफेक झाल्याची घटना आज घडली. यात गाडीच्या खिडकीची काच फुटली असून दोन प्रवाशी जखमी झाले आहेत. भगवान निरंजन साहू असे दगडफेक करणाऱ्याचे नाव असून आरपीएफने त्याला ताब्यात घेतले आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट-विरार दरम्यान धावणाऱ्या जलद एसी लोकलवर कांदिवली स्थानकानजीक दगडफेक झाल्याची घटना दुपारी 3.35 वाजता घडली. यात कोणीही जखमी झाले नसल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले असले तरी खिडकीची काच फुटल्याने दोन प्रवाशी जखमी झाल्याचा दावा उमेश पांडे या प्रवाशाने करत फुटलेल्या खिडकीचा पह्टो ‘एक्स’वर शेअर केला आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाटय़ावर आला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आरपीएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच दगड कोणत्या दिशेने आला याचा तपास केला असता सदरची दगडफेक भगवान साहू यांनी केल्याचे समोर आल्याने त्याला त्याब्यात घेण्यात आले आहे.

घरी भांडण झाल्याने केली दगडफेक

भगवान निरंजन साहू यांच्या घरी भांडण झाल्याने ते वैतागून घराबाहेर पडले होते. रेल्वे ट्रकजवळ आल्यानंतर त्यांनी प्रथम दगड आपल्या डोक्यात मारून घेतला. त्यानंतर समोरून जात असलेल्या जलद एसी लोकलवर दगडफेक केल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे. साहू याने आपण दगडफेक केली असल्याचा गुन्हाही कबूल केला आहे.