कोरोना प्रतिबंधासाठी पुढचे दोन आठवडे अतिशय महत्त्वपूर्ण, गडचिरोली सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना प्रतिबंधासाठी पुढचे दोन आठवडे अतिशय महत्त्वपूर्ण असून, आवश्यकता असेल तरच सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती द्यावी. अन्यथा परस्परांपासून अलिप्त घरातच राहावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा प्रशासनाने केले आहे.

31 तारखेपर्यंत नागरिकांनी आपापल्या आरोग्याची काळजी घ्यावी. गरज पडल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या जिल्हा सनियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. याठिकाणी आता वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची 24 तास तैनाती करण्यात आली आहे. जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र पुढचे दोन आठवडे प्रशासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले.

संपूर्ण देशामध्ये सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली आहे. या परिस्थितीत जवळपास सर्व शासकीय, शैक्षणिक खासगी संस्था बंद करण्यात आलेल्या आहेत. यामागे नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी असून याला सुटी न समजता कुठेही न फिरता घरीच राहणे आवश्यक आहे. परिस्थिती अत्यंत वाईट असून या काळात सर्वांनी सुजाण नागरिक म्हणून काम करणे गरजेचे असल्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.