बकुळीची फुलं

>> डॉ. विजया वाड

प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीला, कष्टाला बकुळीचा सुवास असतो.

सुखदेवने सकाळी सवासातला अख्खा वर्ग पुसला. चकाचक अगदी ओल्या फडक्याने फळा पुसला. त्यावर सुविचार लिहिला- ‘स्वच्छता तेथे देवता.’ गुल्लू वर्गात आला. फळय़ावरचा सुविचार वाचून नि पुसलेली जमीन पाहून म्हणाला, ‘‘आली का देवता?’’ आवाजात खोच होती. ‘‘नाही. अजून अवतीर्ण व्हायची आहे.’’
‘‘कोण? ती खवदूस नरवणे बाई?’’ ‘‘होय आणि त्या खवदूस नाहीत, शिस्तप्रिय आहेत.’’ ‘‘हो का? नुसती खवदूस नाही ती, कुचकी खवदूस आहे. ती वर्गात आली की, कुचका वास सुटतो.’’
‘‘आपल्या शिक्षकांबद्दल असे अपशब्द उच्चारू नयेत गुल्लू.’’ ‘‘आज कुणासाठी पुसला वर्ग?’’ गुल्लूच्या आवाजात खोच होतीच. ‘‘नारायणसाठी त्याची पाठ धरलीय.’’ ‘‘तो तर दहावीचे तिन्ही वर्ग पुसतो.’’ ‘‘मी तीनही वर्ग पुसणार नाही का गुल्लू? अरे, मी नारायणची प्रॉक्सी करतो आहे.’’ सुखदेवचे बोलणे ऐकून गुल्लूला झीटच यायची बाकी होती. का हा करतो हे सगळं? ‘ब’ नि ‘क’सुद्धा पुसले? कम्माल आहे. ‘‘हे बघ… आता बाई आल्यावर सांगायचं की, हे सगळं गुल्लूनं केलंय म्हणून. स्वतःचं नाव पुढे केलंस तर याद राख!’’ गुल्लूच्या बोलण्यात मग्रुरी होती, डोळय़ांत आग होती. एवढय़ात त्याने हलकेच शीळ वाजवली का? गुल्लूला त्याचा मित्र विसू आत येताना दिसला. गुल्लू म्हणाला, ‘‘विसू बघितलंस, आज आपला क्लास मी पुसला. आता 10 ‘ब’ नि ‘क’ तू पूस! त्या कुचकीची शाबासकी मिळवू. सदान्कदा अहेर देत असते शेलक्या शब्दांचा!’’
‘‘या बावळटाने केलं ना काम?’ विसू छद्मीपणाने म्हणाला. ‘‘मग तुला काय वाटलं? मी?’’ दोघांनी एकमेकांच्या हातावर टाळय़ा दिल्या. एवढय़ात घंटा झाली. वारं शिरावं तशी पोरं, पोरी खोलीत शिरली, किलबिलाटानं भरून गेली. ‘‘अय्या, वर्ग काय छान पुसलाय आज? कोपरान्कोपरा चमचम चमकतोय.’’ पोरींनी दिलेलं प्रशस्तीपत्र गुल्लू नि विसूनं झेललं. ‘‘क्क्का।़।़ य? तुम्ही दोघं?’’ ‘‘मग?’’ ‘‘आम्हाला वाटलं सुखदेव!’’ ‘‘हो क्का? सुखदेव आत्ता आलाय वर्गात. काही चँगलॅ झॅलॅ की, सुखीच सुख्या… सुखदेव…’’ गुल्लू वेडावत म्हणाला. इतक्यात नरवणे बाई वर्गात आल्या. त्यांच्या हातात बकुळीची फुले होती. त्या वर्गात जेव्हा फुले आणत तेव्हा त्यामागे संकेत असे. एखादी चांगली कृती एखाद्या मुलाने केली वा मुलीने केली की, त्या तो फुलांचा उपहार त्या मुलास वा मुलीस देत असत.
‘‘बाई, आज गुल्लूने अख्खा वर्ग पुसला.’’ मुली म्हणाल्या. ‘‘तोच बोलला.’’ ‘‘अरे वा!’’ बाई मंद हसल्या. मग त्यांनी सुखदेवला जवळ बोलावले. ‘‘आज नं, एसेस्सीचा गठ्ठा घ्यायला मला हेडबाईंनी लवकर बोलावलं होतं. मी त्यांच्या खोलीत पेपर मोजून घेत होते. तेव्हा सीसीटीव्हीत काय दिसलं? आपला सुखदेव दहावीचे वर्ग पुसत आहे. तासभर अगोदर येऊन नारायणची पाठ धरलीय म्हणून. नारायणच बोलला तसं. मग हेडबाई म्हणाल्या, परीक्षेत चारदोन गुण कमी मिळाले ना तरी खरेच हरकत नाही. दुसऱयाचा विचार करणे, नावाला जागणे, सत्कृत्य करणे हे खरे जीवन शिक्षण. सुखदेव या परीक्षेत डिस्टिंक्शनने पास… नि गुल्लू?… सुधार बाबा! अजून वेळ गेली नाही.’’ फुले सुखदेवच्या ओंजळीत होती हे का मी प्रिय वाचकांना सांगायला हवं?

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या