1 जानेवारीपासून कडक नियम; प्रॉपर्टी एजंटसाठी महारेरा प्रमाणपत्र बंधनकारक

तुम्ही प्रॉपर्टी एजंट असाल किंवा होण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 जानेवारीपासून महारेराच्या प्रमाणपत्राशिवाय प्रॉपर्टी एजंटचा व्यवसाय करता येणार नाही. तसेच महारेराच्या प्रमाणपत्राशिवाय नोंदणी नूतनीकरणही करता येणार नाही. या नियमांचे पालन न करण्यांवर कारवाई होणार आहे. तसे आदेश महारेराने जारी केले आहेत.

महारेराने 10 जानेवारी 2023च्या आदेशान्वये एजंट्सच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक केले आहे. आता 1 जानेवारीपासून हे प्रमाणपत्र असल्याशिवाय नवीन एजंट म्हणून नोंदणी किंवा नूतनीकरणही न करण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे. सध्याच्या परवानाधारक एजंट्सना आणि विकासकांकडील या कामांशी संबंधित कर्मचाऱ्यांनाही 1 जानेवारीपूर्वी हे प्रमाणपत्र मिळवून त्यांच्या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे. विकासकांनीही 1 जानेवारीनंतर अशाच प्रशिक्षित एजंट्सचीच नावे संकेतस्थळावर ठेवावी आणि त्यांची मदत घ्यावी, असेही या आदेशात नमूद आहे.

आतापर्यंत 8 हजार एजंट्स पात्र

स्थावर संपदा क्षेत्रातीलएजंटहा घर खरेदीदार आणि विकासकांतील  महत्त्वाचा दुवा आहे. बहुतेक वेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटच्या संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडून मिळते. म्हणून ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवूनच महारेराने एजंटसने प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक केलेले आहे. महारेराच्या आतापर्यंत झालेल्या 3 परीक्षांमधून सुमारे 8 हजार एजंट्स पात्र ठरलेले आहेत.