दिल्ली-एनसीआर हादरले; 3.1 तीव्रेतेचा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली एनसीआरसह उत्तर हिंदुस्थान रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास भूकंपाच्या मध्यम धक्क्यांनी हादरले आहे. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 3.1 एवढी नोंदवण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्र हरियाणाच्या फरिदाबादमध्ये जमिनीपासून 10 किलोमीटर खोलीवर होते. याआधी 3 ऑक्टोबरला राजधानी दिल्लीसह उत्तर हिंदुस्थानात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता.

राजधानी दिल्लीत 3 ऑक्टोबर रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी नेपाळमध्ये 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे दिल्ली एनसीआरसह उत्तर हिंदुस्थानातील अनेक भागांमध्ये हादरे जाणवले होते. या भूकंपामुळे दिल्लीसह आसपासच्या भागात बराच वेळ जमीन हादरत होती. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

पुन्हा एकदा रविवारी भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावारण होते. सारखे हादरे जाणवत असल्याने अनेकजण घरातून बाहेर आले होते. मात्र, आजच्या भूकंपाची तीव्रता कमी होती. त्यामुळे जिवीत किंवा वित्तहानीचे वृत्त नाही. उत्तर हिंदुस्थानसह रविवारी दुपारी पश्चिम अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. आठवडाभरापूर्वी आलेल्या भूकंपामुळे अफगाणिस्तानातले जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातच रविवारी पून्हा एकदा अफगाणिस्तानात भूकंप झाला.