रात्रंदिवस गेम खेळणाऱ्या तरुणाचा अपुऱ्या झोपेमुळे मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाईन गेम्सचे अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत. गेम्सचे हे व्यसन अनेकांच्या जीवावर बेतले आहे. ऑनलाईन गेम्सच्या आहारी जात अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, ऑनलाईन गेममुळे अपुरी झोप होत असल्याने त्याच्या अतिताणामुळे हृदयविकाराचा धक्का आल्याने एका 18 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना थायलंडमध्ये घडली आहे. या घटनेने ऑनलाईन गेम्सच्या धोक्याबाबत चर्चा होत आहेत.

ऑनलाईन गेम खूप आकर्षक असल्याने मुले त्याकडे आकर्षित होतात. गेम खेळताना त्यांना वेळेचे भान राहत नाही. ते कितीही वेळ गेम खेळत राहतात. त्यातून त्यांना या गेम्सचे व्यसन लागते आणि ते गेमच्या आहारी जातात. आपला मुलगा रात्रभर जागून ऑनलाईन गेम खेळत होता. सकाळी त्याला शाळेसाठी उठवायला गेल्यावर तो गेम खेळत जागाच असायचा. त्याला कंप्यूटरवर गेम खेळण्यास नकार दिला तर तो मोबाईलवर गेम खेळायचा. मात्र, तो दिसभर अॅक्टिव्ह असायचा. तो कधीही पेंगुळलेला दिसायचा नाही. त्यामुळे आपल्याला त्याची चिंता वाटली नाही, असे त्याच्या आईने सांगितले.

आपण मुलाच्या शेजारच्या खोलीत होतो. त्याच्या खोलीतून रात्री गेम खेळण्याचा आवाज येत होता. तो रात्री आंघोळ करून सकाळपर्यंत गेम खेळायला बसायचा. मात्र, एका रात्री त्याचा आंघोळ करताना किंवा गेमचा आवाज येत नसल्याने आपण त्याला फोन केला. त्याने फोनही उचलला नाही. तसेच दरवाजा वाजल्यावर त्याने उघडलाही नाही. त्यामुळे आपण घाबरलो आणि शेजाऱ्यांना बोलावले.

शेजाऱ्यांचा मदतीने दरवाजा उघडल्यावर तो बेशुद्ध पडल्याचे दिसून आले. त्याचा मोबाईल त्याच्याजवळच पडला होता. गेम खेळतानाच तो बेशुद्ध पडला होता. त्याला रुग्णालयात दाखल केल्यावर अतिताणाने त्याला हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.हा मुलगा रात्रभर गेम खेळून सकाळी शाळेत जात होता. त्यामुळे त्याची झोप पूर्ण होत नव्हती. शरीराला आवश्यक ती विश्रांती मिळत नसल्याने त्याच्यावर ताण येत होता. मात्र, गेम्सच्या आहारी गेल्याने त्याला याची जाणीव होत नव्हती.

याआधाही ऑनलाईन गेम्सच्या आहारी गेल्याने अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच 2017मध्येही प्रसिद्ध ट्विटर गेमरचा मृत्यू झाला होता. हा गेमर 24 तास गेमिंग मॅरोथॉन करत होता. तसेच लाईव्ह स्ट्रीमद्वारे अनेक फाउंडेशनला मदतही करत होता. या अतिताणामुळे त्याचा मृत्यू झाला होता. या घटनांमुळे ऑनलाईन गेम्सच्या दुष्परिणामांबाबत चर्चा होत आहे.