
साखरखेर्डा येथून जवळच असलेल्या जागदरी येथील रहिवासी अनंता दत्तात्रय गिते हे हरयाणा मधील हिसार येथे सेवा बजावित असतानाच 24 डिसेंबर रोजी काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात जागदरी येथे 26 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जागदरी येथील सुभेदार अनंता दत्तात्रय गिते यांची सैनिक दलात 27 वर्ष 4 महिने सेवा झाली. हरयाणामधील हिसार येथे सेवा बजावित असतांनाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. नेमका त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे कळू शकले नाही. देशासाठी त्यांनी बलीदान दिले आहे. शहीद अनंता गिते यांच्यावर जागदरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सकाळी पाच वाजता छत्रपती संभाजी नगर येथे त्यांचे पार्थिव येईल. तेथून जालना, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा मार्गे जागदरी येथे दुपारी 12 वाजता पोहोचेल. यावेळी शासकीय अधिकारी मानवंदना देतील. शहीद अनंता गिते यांच्या निधनाची वार्ता जागदरीसह संपूर्ण तालुक्यात पोहचताच प्रत्येक गावात त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहे.
शहीद अनंता दत्तात्रय गिते हे सुभेदार या पदावर कार्यरत होते. 27 वर्ष चार महिने त्यांनी सेवा बजावली होती. ऑगस्ट 2024 ला महिन्यात त्यांचा सेवा काळ समाप्त होऊन ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या मागे एक मुलगा, डॉक्टर मुलगी, वडील, आई, भाऊ हे संभाजीनगर येथे पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांच्या निधनाची वार्ता जागदरी येथे धडकताच संपूर्ण गाव शोकाकुल झाला आहे.


























































