सुएझ कालव्यात अडकलेले महाकाय जहाज अखेर मार्गस्थ, अनेक देशांनी घेतला सुटकेचा नि:श्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुएझ कालव्यात अडकलेले महाकाय कार्गो जहाज अखेर सहा दिवसांनी मार्गस्थ करण्यात यश आले. इन्च केप शिपिंग सर्व्हिसेसच्या वतीने सोमवारी ही माहिती देण्यात आली. ’एव्हरग्रीन’ नावाचे हे जहाज मधेच अडकल्यामुळे सुएझ कालव्याच्या दोन्ही बाजूने जवळपास 150 हून अधिक मालवाहक जहाजे अडकून पडली होती. त्यामुळे जहाजाची सुटका झाल्यानंतर अनेक देशांनी सुटकेच्या निःश्वास घेतला आहे.

एव्हरग्रीन’ जहाजाची आशिया आणि युरोपदरम्यान जलवाहतूक सुरू असते. जगातील सर्वात मोठय़ा मालवाहक जहाजांपैकी हे एक जहाज आहे. इजिप्तच्या स्थानिक वेळेनुसार, सोमवारी सकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी हे जहाज सुएझ कालव्यातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मागील पाच दिवस खोळंबलेली जहाज वाहतूक अखेर मार्गी लागली. हे जहाज अडपून राहिल्यामुळे युरोपला मोठा फटका बसला. तसेच हिंदुस्थानलाही नुकसान सोसावे लागले.

या पार्श्वभूमीवर सरकारने या संकटातून मार्ग काढण्यासाठी एक योजना बनवली होती. दुसऱया देशांमध्ये आयात-निर्यातीसाठी गुंतलेल्या हिंदुस्थानी मालवाहक जहाजांना सुएझ कालव्यातील ट्राफिक जामपासून वाचण्यासाठी केप ऑफ गुड होपमार्गे जाण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

प्रत्येक तासाला व्यापाराचे 400 दशलक्ष डॉलर नुकसान

देशादेशांत जलमार्गाने होणाऱया व्यापारामध्ये सुएझ कालवा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. याच कालव्यात महाकाय जहाज अडपून पडल्यामुळे व्यापाराला मोठा फटका बसला. प्रत्येक तासाला व्यापाराचे 400 दशलक्ष डॉलर नुकसान झाले. मागील पाच दिवसांत अनेक देशांना या तोटय़ाची झळ बसली. सुएझ कालव्यातून प्रत्येक दिवसाला 50 जहाजांची येजा सुरु असते. जगभरातील 12 टक्के व्यापार सुएझ कालव्यामार्गे होतो.