
अभिनेत्री सुहानी भटनागर हिने अवघ्या 19 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. दंगल फेम अभिनेत्री एवढ्या लवकर गेल्यामुळे चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. निधनानंतर तिच्या वडिलांनी ती आजारी असल्याची माहिती दिली आहे.
एका दुर्मिळ आजाराने ग्रासल्याने सुहानी गेल्या 2 महिन्यांपासून जागेवर होती. 2 महिन्यांपूर्वी सुहानीच्या हाताला सूज येऊ लागली होती. मात्र ती सुरूवातीला त्याकडे तिने फारसे लक्ष दिले नाही. हळूहळू दुसऱ्या हातालाही सूज येऊ लागली, आणि त्यानंतर संपूर्ण शरीर सुजले. यामुळे अनेक डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला. परंतु आजाराचे नेमके कारण समजले नाही. त्यानंतर सुहानीला दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल केले. तेथे तिच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये सुहानीला डर्माटोमायोसिस नावाचा आजार असल्याचे निदान झाले. हा आजार अंत्यत दुर्मिळ आजारांच्या श्रेणीत येतो. या आजारावर एकमेव उपाय म्हणजे स्टेरॉईड्स. सुहानी स्टेरॉईड्स सुरू करण्यात आले, मात्र यामुळे तिच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमकुवत झाली.
सुहानीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या आजारातून बरे होण्याकरीता बराच वेळ लागतो. परंतु प्रतिकार शक्ती कमकुवत झाल्याने सुहानीला संसर्ग झाला, आणि त्याचा परिणाम तिच्या फुफ्फुसांवर झाला. फुफ्फुसात पाणी झाल्याने तिला श्वास घेणे कठीण झाले. गेल्या मंगळवारी प्रकृती अधिक बिघडल्याने नवी दिल्लीतील एम्स रूग्णालयात तिला दाखल करण्यात आले होते. 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी तिने रूग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.
सुहानीच्या आई वडीलांनी त्यांना त्यांच्या मुलीचा खूप अभिमान असल्याचे सांगितले. दंगल चित्रपटासाठी 25 हजार मूलींमधून तिची निवड करण्यात आली होती. लहानपणापासून तिला अभिनयाची आवड होती. आता ती मास कम्युनिकेशम आणि जर्नलिझमचा कोर्स करत होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चित्रपटांकडे वळण्याचा तिचा मानस होता, पण तिचे हे स्वप्न अपूर्णच राहिले.
























































