
‘अति घाई, संकटास आमंत्रण देई’ ही वाक्य सध्या हिंदुस्थानचा सलामीवीर शुभमन गिलसाठी खरी ठरताहेत. गिलला फलंदाजीतला अतिआक्रमकपणा नडू लागलाय. त्याने आपल्या अतिआक्रमकपणाला वेसण घालावी, असा सल्ला हिंदुस्थानचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी दिला आहे.
2023 या वर्षात हिंदुस्थानी क्रिकेटचा सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून गिलचे नाव सर्वात वर होते, मात्र वर्ल्ड कपपासून त्याच्या फलंदाजीत झालेली घसरण आता सर्वांच्या डोळय़ात खुपू लागलीय. दक्षिण आफ्रिका दौऱयातही त्याच्याकडून दमदार सलामीची अपेक्षा होती, पण सुपरस्पोर्ट्सवर 2 आणि 26 अशा निराशाजनक खेळी त्याने केल्या. गावसकरांनी गिलला पांढरा चेंडूच्या तुलनेत कसोटी क्रिकेटच्या गरजांकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. गिलवर पांढऱया चेंडूच्या क्रिकेटचा अधिक प्रभाव झालाय. त्यामुळे तो कसोटी क्रिकेटला अधिक आक्रमकपणे खेळत असल्याचे मत गावसकरांनी व्यक्त केले. जेव्हा तुम्ही कसोटी क्रिकेट खेळता तेव्हा टी-20 किंवा वन डे क्रिकेटची तुलना करून शकत नाही. हा खेळ पूर्णपणे वेगळा आहे.
गावसकर पुढे म्हणाले. लाल चेंडू हवेत आणि खेळपट्टीवर पांढऱया चेंडूच्या तुलनेत अधिक वळतो तसेच उसळतोही. हे त्याने लक्षात ठेवायला हवे. गिलने पांढऱया चेंडूच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळ केला आहे, पण क्रिकेट मूळ फॉरमॅटमध्ये तो स्वतःला सिद्ध करण्यात अपयशी ठरतोय. 2023 मध्ये खेळलेल्या सहा कसोटींतील दहा डावांत 21, 5, 128, 13, 18, 6, 10, 29, 2, 26 अशा खेळी केल्या आहेत. एक शतकी खेळी वगळता अन्य कसोटींत त्याचे तंत्र सपशेल फेल ठरले आहे. गिल आपल्या अतिआक्रमकपणा वेळीच आवरेल आणि स्वतःलाही लवकर सावेरल, अशी आशा व्यक्त केली आहे. गिलने आपल्या कारकीर्दीच्या प्रारंभी जबरदस्त फलंदाजी केली. त्याच्या फटक्यांचे आम्ही सर्वांनीच तोंडभरून कौतुक केले होते. आता आम्ही केवळ त्याच्या फलंदाजीला सूर सापडेल, अशीच आशा करू शकतो. तो कठोर ट्रेनिंग करेल आणि भविष्यात चांगली कामगिरी करेल. हिंदुस्थानी संघासमोर आता केपटाऊन कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविण्याचे ध्येय आहे.

























































