
पहिल्याच कसोटीत तिसऱयाच दिवशी टीम इंडियाचा खेळ खल्लास झाल्यामुळे संघावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. हिंदुस्थानचे महान फलंदाज आणि समालोचक सुनील गावसकर हेसुद्धा टीम इंडियावर चांगलेच भडकले असून एकही सराव सामना न खेळता थेट कसोटी सामना खेळायला मैदानावर उतरलात तर हीच गत होणार, अशा शब्दांत सुनील गावसकर यांनी टीम इंडियाचे कान उपटले आहेत.
हिंदुस्थानला अद्याप दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे आफ्रिकेत कसोटी मालिका विजयाचे स्वप्न घेऊन मैदानावर उतरलेल्या हिंदुस्थानी संघाच्या स्वप्नांना पहिल्याच कसोटी सामन्यात सुरुंग लागला आहे. सेंच्युरियन कसोटी सामन्यात आफ्रिकेने तीन दिवसांतच हिंदुस्थानचा एक डाव आणि 32 धावांनी दारुण पराभव केला. आफ्रिकेने पहिल्या डावात 163 धावांची घेतलेली आघाडी हिंदुस्थानी फलंदाजांना भेदता आली नाही. हिंदुस्थानी संघ 131 धावांवरच पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
हिंदुस्थानच्या या लाजीरवाण्या पराभवानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान, ‘स्टार स्पोर्ट्स’वर सुरू असलेल्या संवादादरम्यान सुनील गावसकर यांना टीम इंडियाच्या पराभवाचे प्रमुख कारण विचारण्यात आले. त्यावेळी गावसकर म्हणाले, परदेशात कसोटी मालिका खेळण्यासाठी जाता तेव्हा तेथील परिस्थिती जाणून घेण्यासाठी मालिकेपूर्वी सराव सामना खेळणे तितकेच महत्त्वाचे असते, मात्र हिंदुस्थानी संघाने सराव सामना न खेळून घोडचूक केली आहे. सराव सामना खेळला नाही तर यापेक्षा वेगळी परिस्थिती असूच शकत नाही. टीम इंडियाने येथे सराव सामना खेळायलाच हवा होता, अशा शब्दांत त्यांनी टीम इंडियावर टीका केली आहे.































































