
आर्थर रोड कारागृहात असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेण्याची परवानगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तुरुंग प्रशासनाने नाकारल्याचे वृत्त पूर्णतः चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी आज येथे दिले.
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना जेलरच्या दालनात भेटण्याची परवानगी मागितली होती, असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दाखवले. मात्र हे वृत्त निराधार असल्याचे आमदार सुनील राऊत यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांना भेटण्यासाठी न्यायालयामार्फत परवानगी मागण्याची सूचना तुरुंग प्रशासनाने केल्याचेही वृत्त दाखवले गेले. यावर आमदार सुनील राऊत म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांची भेट घेण्याची प्रचंड इच्छा आहे. लवकरच ही भेट होईल. पण कायद्याच्या चौकटीत आणि रीतसर परवानगी घेऊनच ही भेट होणार आहे. सध्यातरी आम्ही अशी कोणतीही परवानगी मागितलेली नाही.’



























































