
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानासाठी ‘ईव्हीएम’ऐवजी मतदानपत्रिकांचा वापर करावा, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. ही याचिका ‘न्यायभूमी’ या स्वयंसेवी संस्थेने दाखल केली होती.
त्या याचिकेवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अधिपत्याखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. ‘ईव्हीएम’ मशीनचा गैरवापर होणे शक्य असल्याने निष्पक्ष निवडणूक पार पडण्यासाठी ईव्हीएमचा वापर करता कामा नये, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती. मात्र याचिकाकर्त्यांच्या या मताशी सर्वोच्च न्यायालयाने असहमती व्यक्त केली. प्रत्येक मशीनचा आणि पद्धतीचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. सगळीकडेच संशयाला जागा असते, असे सांगत सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने मतदानपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी धुडकावली.
























































