
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत असणारे भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी अजून एका वादग्रस्त विधान केलं आहे. बलात्काराच्या वाढत्या घटनांवर बोलताना त्यांनी, प्रभू रामचंद्र आले तरीही बलात्कारावर नियंत्रण ठेवणं शक्य नाही, असं वक्तव्य केलं आहे.
वाढत्या बलात्कारांवर बोलताना सुरेंद्र सिंह आपले मत मांडताना म्हणाले की, माझा हा दावा आहे की, बलात्कार रोखणं शक्य नाही. साक्षात प्रभू रामचंद्र आले तरीही हे प्रकार रोखले जाणार नाहीत. ही एक सामाजिक विकृती आहे, ज्यापासून कोणीही अलिप्त राहू शकत नाही, असं सिंह म्हणाले आहेत. तसंच ”अधिकाऱ्यापेक्षा वेश्या अधिक चरित्रवान असतात. कारण, पैसे घेऊन त्या काम करतात पण अधिकारी पैसे घेऊनही काम करतीलच अशी खात्री देता येत नाही” असंही सिंह म्हणाले आहेत.
वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही सिंह यांची पहिलीच वेळ नसून यापूर्वीही सिंह यांनी अशाच वक्तव्यांमुळे वाद ओढवून घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मंत्री ओमप्रकाश राजभर यांची तुलना चक्क कुत्र्याबरोबर केल्याने त्यांनी वाद ओढवून घेतला होता. तसंच उन्नाव बलात्कार प्रकरणात तीन मुलांच्या आईवर कोणी बलात्कार करतं का, असा प्रश्न विचारून त्यांनी वादाला तोंड फोडलं होतं.






















































