
राज्यातील सध्याचे ‘खोक्यां’चे सरकार हे फार तर तीन महिन्यांचेच असल्याचे सांगत जातीजातीत विष पेरणाऱया या सरकारला गाडून टाका, असे आवाहन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची महाप्रबोधन यात्रा बुधवारी गारगोटीत आली. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत सुषमा अंधारे यांनी शिवसेनेशी गद्दारी करणाऱया मिंधे गटाचा जोरदार समाचार घेतला. सुषमा अंधारे म्हणाल्या, महाराष्ट्रात टीम देवेंद्र जातीचे विष पेरत आहेत. एकनाथ शिंदेंचे मिंधे सरकार आता तीन महिन्यांचेच आहे. आमची महाप्रबोधन यात्रा राज्यातल्या जनतेला सावध करण्यासाठी व आगामी निवडणुकीत भाजपला नेस्तनाबूत करण्यासाठी तयार आहे. महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून या बेजबाबदार सरकारला धडा शिकवूया, असे आवाहन त्यांनी केले.
एकनाथ शिंदेना मुंख्यमंत्री करणे ही भाजपची चाल आहे. तुम्ही अनेक आरोप करता मग नगररचना खात्याच्या आर्थिक व्यवहाराचे काय? सचिन जोशीचे काय झाले? त्याला समृद्धीच्या नोटिसा दिल्या होत्या. नारायण राणेंच्या बंगल्यावर हातोडा का चालवत नाहीत, असे सवाल करत अशा दगाबाजांना जनता माफ करणार नाही, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, सुरेश चौगुले, दीनानाथ चौगुले, भुदरगड तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, तानाजी देसाई, उपतालुकाप्रमुख अशोक पाटील, महिला उपजिल्हा संघटिका रंजना अंबिका, मेरी डिसुजा, शांता जाधव, भिकाजी हळवणकर, उत्तम पाटील, राजू सावंत, संभाजी पाटील, युवराज पवार, संजय येसादे, शिवगण पाटील, अशोक पाटील, प्रसाद पिलारे, अवधूत पाटील, संतोष चिकोडे, सागर भापके, रवी पाटील, दिलीप माने, सचिन पाटील माजगावकर, लक्ष्मण मनमाडकर उपस्थित होते.






























































