अरूणाचल प्रदेशमध्ये संशयित पाकिस्तानी हेराला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। ईटानगर

अरुणाचल प्रदेशमधील हिंदुस्थान-चीन सीमेजवळील अंजाव जिल्ह्यातून एका संशयित पाकिस्तानी हेराला अटक करण्यात आली आहे. निर्मल राय असे त्याचे नाव आहे. तो मूळचा आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यतील सदीया गावचा रहिवासी आहे.

तो लष्कराच्या किबिथु आणि दिचु या सीमेवरील चौकीत सामानाची ने आण करण्याचे काम करायचा. या दोन्ही चौक्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच आहेत. राय याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने महिनाभर अधिकाऱ्यांनी त्याच्यावर वॉच ठेवला होता. अखेर ६ जानेवारीला त्याला जवानांनी अटक केली. त्यानंतर अरुणाचल प्रदेश पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले. राय नेपाळी समाजाचा असून किबिथु येथे येण्याआधी तो २०१६-१८ पर्यंत दुबईत एक बर्गरच्या दुकानात काम करायचा. त्यानंतर त्याने हिंदुस्थानच्या लष्करात नोकरी मिळवली. पाकिस्तानची गुप्तचर संघटना असलेल्या आयएसआयच्या हेरांनीच रायला दुबईत हेरगिरीचे प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर तो किबिथु येथील लष्कराच्या प्रत्येक हालचालींची माहिती आयएसआयला देत होता. हिंदु्स्थानी सैनिकांची संख्या, त्यांचे ठिकाणं ,हत्यार,आणि तोफा यांबद्दल राय शत्रूपक्षाला माहिती पुरवत असल्याचे चौकशीत समोर आले. राय याच्याजवळून एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.