
योगेश पाटील, हिंगोली
येथील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक बाराच्या पोलीस भरती प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन साहाय्यक समादेशक जयराम फुफाटे आणि निलंबित जवान संदीप केशव जुमडे या दोघांना पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या पथकाने अटक केली आहे. हिंगोलीच्या एसआरपीएफ मध्ये २०१३ ते २०१७ या चार वर्षांत तब्बल वीस जवानांचे उत्तर पत्रिकेत गुण वाढवून भरती करून घेण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले होते.
त्यानंतर ११ मे रोजी या प्रकरणामध्ये भरती झालेल्या २० जवानांसह तत्कालीन साहाय्यक समादेशक जयराम फुफाटे या प्रकरणातील मास्टरमाईंड नामदेव ढाकणे आणि सॉफ्टवेअर कंपनीच्या तंत्रज्ञाविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने हे करत आहेत. एसआरपीचे समादेशक योगेश कुमार यांनी गुण वाढवून भरती झालेल्या २० जवानांना तातडीने निलंबित केले होते.
या प्रकरणात आतापर्यंत २०च्या वर आरोपींना अटक झाली आहे. तत्कालीन साहाय्यक समादेशक जयराम फुफाटे हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. मदने यांच्या पथकाने त्यांचा माग घेऊन अटक केली आहे. फुफाटे यांच्या अटकेमुळे या प्रकरणातील आणखी माहिती उजेडात येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे. तसेच निलंबित जवान संदीप केशव जुमडे यालाही पोलिसांनी अटक केल्याचे मदने यांनी सांगितले.

























































