ऐटीत एटमध्ये; विजयाच्या हॅटट्रिकसह हिंदुस्थानची सुपर एटमध्ये धडक

अमेरिकेने 111 धावांचे माफक आव्हान उभारले असतानाही हिंदुस्थानला झुंजवण्याची किमया साधली. अमेरिकेने  3 बाद 44 अशी अवस्था करून हिंदुस्थानला अडचणीत आणले होते, पण सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या मुंबईकरांनी 67 धावांची झुंजार भागी रचत हिंदुस्थानला 7 विकेट्सनी विजयाची हॅटट्रिक साधून दिली आणि हिंदुस्थानने  ऐटीत सुपर एटमध्ये धडक मारली.

मुंबईकरांनी दिवस गाजवला

पहिला डाव अर्शदीपने गाजवला असला तरी दुसऱया डावात मुंबईकरांचा आवाज घुमला. मुंबईकर सौरभ नेत्रावळकरने आपल्या पहिल्या सात चेंडूंत विराट कोहली (0) आणि रोहित शर्माला (3) बाद करत हिंदुस्थानला हादरवले. गेल्या सामन्यात फटकेबाजी खेळी करणारा ऋषभ पंतही लवकर बाद झाल्यामुळे हिंदुस्थान 3 बाद 44 अशा संकटात सापडला होता. तेव्हा मैदानात गेल्या दोन्ही सामन्यांत अपयशी ठरलेले मुंबईकर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे होते. दोघांनीही अत्यंत सावध आणि शांत खेळ करत एकेरी दुहेरी धावांवर भर देत डावाला सावरले सूर्ये (ना.50) आणि दुबेच्या (ना.31) संयमी खेळीमुळेच हिंदुस्थानने दहा चेंडू आधीच विजयी लक्ष्य गाठले.

विजयाचा पाया पहिल्याच षटकात

आजच्या विजयाचा पाया अर्शदीप सिंहने पहिल्याच षटकात रचला होता. त्याने सामन्याच्या पहिल्या चेंडूंवर सलामीवीर शायन जहांगिरला पायचीत केले आणि सहाव्या चेंडूवर आंद्रिस गोसला बाद करत अमेरिकेची 2 बाद 3 अशी अवस्था केली. मात्र त्यानंतर अमेरिकेने छोटय़ा-छोटय़ा भागीदाऱया रचत संघाला धावांचे शतक गाठण्याचा पराक्रम केला. अर्शदीप (9 धावांत 4 विकेट) आणि हार्दिक पंडय़ाने टप्प्याटप्प्याने अमेरिकेला  धक्के दिले.