पूरन वादळाचा अफगाणिस्तानला तडाखा, अवघ्या दोन धावांनी हुकले पूरनचे शतक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॅरेन सॅमी स्टेडियमवर निकोलस पूरन नावाचे वादळ घोंघावले आणि या वादळात अफगाणिस्तानची प्रभावी आणि भेदक गोलंदाजी उडून केली. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधील पहिलेवहिले शतक साकारण्याचे पूरनचे प्रयत्न अवघ्या दोन धावांनी धावचीत झाले. पण त्यांनी वर्ल्ड कपमध्ये दुसऱयांदा शतकी विजय साकारताना अफगाणिस्तानचा 104 धावांनी दारुण पराभव करत साखळीत अपराजित राहात विजयाचा षटकार खेचला.

पूरनचा झंझावात थेट चेंडूफेकीने थांबला

गेल्या 39 सामन्यांत एकाही फलंदाजाला शंभरी गाठता आली नव्हती. मात्र आज ती संधी पूरनने निर्माण केली होती. त्याने आज अद्भुत षटकारबाजी करताना पहिल्या 13 चेंडूंत 36 आणि शेवटच्या 13 चेंडूंत 43 धावांचा वर्षाव केला. मात्र मध्ये तो काहीसा सावध खेळत असल्यामुळे 27 चेंडूंत 19 धावा काढल्या. शेवटच्या षटकात 85 धावांवर असलेल्या पूरनने सलग दोन षटकार खेचत 97 धावांवर झेप घेतली. मग सारेच त्याच्या शतकाची वाट पाहत असताना तिसरा चेंडू निर्धाव गेला आणि चौथ्या चेंडूवर दुहेरी धाव घेताना ओमरझाईच्या थेट रॉकेट शोने पूरनचा झंझावात रोखला. यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिलेवहिले शतक 2 धावांनी हुकले. पूरनने 53 चेंडूंत 8 षटकार आणि 6 चौकार खेचत 218 धावसंख्या उभारून दिली.

षटकारांची बरसात

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये प्रतिस्पर्धी संघाचे मुश्किलीने 100-125 धावा होत होत्या. त्यामुळे ही स्पर्धा अत्यंत कमी धावसंख्येची झाली. साखळीतील 40 पैकी 3 सामन्यांतच 3 संघ द्विशतकी धावसंख्या उभारू शकले. सर्वप्रथम द्विशतकी टप्पा ऑस्ट्रेलियाने गाठताना इंग्लंडविरुद्ध 7 बाद 201 धावा केल्या होत्या तर परवा श्रीलंकेने आयर्लंडविरुद्ध 6 बाद 201 मजल मारली. मात्र आज या सर्व धावसंख्येला मागे टाकत विंडीजने या स्पर्धेतील 218 ही सर्वोच्च धावसंख्या उभारली.

आठव्या षटकांत शतक

आज प्रथमच आठ षटकांत संघाचे शतक ठोकले गेले. पूरन आणि जॉन्सन चार्ल्सने अफगाणिस्तानच्या गोलंदाजीला पॉवर प्लेमध्ये पह्डून काढताना 37 चेंडूंत 80 धावांची भागी रचली. त्यानंतर एका बाजूने पूरनचा घणाघात तर दुसऱया बाजूने शाय होप (25) आणि रोव्हमन पॉवेल (26) यांनी खणखणीत फटके मारत विंडीजला द्विशतकापार नेले.

पहिल्याच षटकांत अफगाण हादरले

स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाज असलेला रहमनुल्लाह गुरबाज पहिल्याच षटकात एकही धाव न करता बाद झाल्याने अफगाणिस्तान अक्षरशः हादरला. मग इब्राहिम झदरान (38) आणि अझमतुल्लाह ओमरझाईने (23) धावा काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी लक्ष्याचा पाठलाग करणे सोडल्यामुळे अफगाणचा पूर्ण डाव 114 धावांत आटोपला. स्पर्धेत प्रथमच संधी मिळालेल्या ओबेद मकॉयने 14 धावांत 3 विकेट घेत अप्रतिम मारा केला. तसेच अकील होसेन आणि गुदाकेश मोतीने प्रत्येकी 2-2 विकेट घेत संघाचा विजय निश्चित केला.

शतकी विजयात तिघांचाही समावेश

यंदा वर्ल्ड कपमध्ये तीनच सामन्यांत शतकी विजय नोंदवले गेले. या तिन्ही विजयात वेस्ट इंडीज, अफगाणिस्तान आणि युगांडा हे तिन्ही संघांचा समावेश होता. वेस्टे इंडीजने आपला पहिला शतकी विजय युगांडाविरुद्ध साकारताना त्यांचा 39 धावांत फडशा पाडला होता तर अफगाणिस्ताननेही युगांडाचा डाव 58 धावांत गुंडाळताना 125 धावांची विजय नोंदविला. तसेच आता विंडीजने अफगाणिस्तानचा 104 धावांनी पराभव केला.

ओमरझाईच्या एका षटकात 36 धावा

निकोलस पूरनने ओमरझाईच्या सामन्यातील चौथ्याच षटकांत 36 धावा काढून युवराज सिंगच्या 36 धावांच्या विश्वविक्रमाची बरोबरी साधली, मात्र या षटकांत ओमरझाईने एकाच चेंडूंवर 16 धावा मोजल्या होत्या. त्याच्या पहिल्या चेंडूवर पूरनने षटकार ठोकल्यानंतर पुढच्या नो बॉलवर चौकार ठोकला. मग वाइड चेंडू सीमारेषेपार गेल्याने एकाच चेंडूंवर 16 धावा निघाल्या होत्या. मात्र त्यानंतर फ्री हिटचा चेंडू निर्धाव केला. तिसरा चेंडू पायाला लागून सीमापार गेला. त्यानंतर पुढील तीन चेंडूंवर 4, 6, 6 धावा ठोकत 36 धावा वसूल केल्या गेल्या. त्यापैकी 26 धावा पूरनच्या बॅटीतून निघाल्या तर 10 धावा अवांतर होत्या.