कोरोना होऊ नये म्हणून साप खाल्ला, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना होऊ नये, शरीराची प्रतिकारक क्षमता वाढावी यासाठी एका शेतकऱ्याने चक्क मेलेला साप कच्चा खाल्ल्याचे समोर आले आहे. तामिळनाडूतील मदुराईमधील पेरुमपट्टी गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी वन विभागाने वाडिेवेलू नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.

वाडिवेलू याने साप खातानाचा त्याचा व्हिडीओ तयार केला होता. तो व्हिडीओ त्याच्या एका नातेवाईकाने सोशल मीडियावर टाकला. त्या व्हिडीओत वाडिवेलू एक मेलेला साप खाताना दिसत असून तो कोरोनाला दूर ठेवण्यासाठी साप खाणे फायदेशीर ठरेल असे सांगताना दिसत आहे. त्याची ही व्हिडीओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाली आहे.

ही क्लिप मदुराईचे वन अधिकारी एस. आनंद यांनी पाहिली त्यानंतर त्यांनी वाडिवेलूला अटक करण्याचे आदेश दिले. वाडिवेलू याला अटक केली असून वन अधिकाऱ्यांनी त्याला सात हजारांचा दंडही ठोठावला आहे.
‘वाडिवेलू याने जो साप खाल्ला तो विषारी साप आहे. त्याने मेलेला साप खाल्ल्याने त्याला सापाने चावले नाही. मात्र या सापातील विष माणसाच्या शरीरात गेल्याने माणसाला अर्धांगवायूचा झटका येतो. सुदैवाने याच्या बाबतीत असे घडले नाही. मात्र याने जी माहिती लोकांना दिली आहे त्यामुळे आणखी काही लोकं असा प्रकार करू शकतील’, असे आनंद यांनी सांगितले.

दरम्यान ती क्लिप तयार केली तेव्हा वाडिवेलू दारूच्या नशेत होता व काही लोकांनी उसकवल्यानंतर त्याने साप खाल्ल्याचे पोलीस चौकशीत सांगितले आहे.