ऐतिहासिक तथ्यांशी फेरफार केल्याप्रकरणी तान्हाजीविरोधात उच्च न्यायालयात याचिका

515

हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत प्राणांची बाजी लावून स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांची उत्कंठा ताणली गेली होती. मात्र, आता हा चित्रपट वादात सापडण्याची चिन्हं आहेत.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली येथील अखिल भारतीय क्षत्रिय कोळी राजपूत संघाने या चित्रपटाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेनुसार, या चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांशी फेरफार करण्यात आली आहे. तानाजी मालुसरे यांची मूळ वंशावळ वेगळी असून चित्रपटात त्यांना वेगळ्या वंशाचे दाखवण्यात आले आहे, असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे.

या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात 19 डिसेंबर रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर तान्हाजी यांची पत्नी सावित्रीबाई यांच्या भूमिकेत अभिनेत्री काजोल झळकणार आहे. या खेरीज शरद केळकर, पद्मावती राव, सैफ अली खान, अजिंक्य देव, देवदत्त नागे हे कलाकारही यात विविध भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या