प्रासंगिक – तारकर्लीतील ‘श्रीरामनवमी’ उत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मनमोहन रो. रोगे

श्रीरामनामाची महती ऋषीमुनींनी, साधूसंतांनी अनेक ठिकाणी सांगितलेली आहे. श्रीराम हे हिंदूंचे प्रमुख दैवत. प्रत्येकाच्या मनामनात, रोमारोमात राम वसला आहे. म्हणूनच एखादी गोष्ट पटली नाही तर त्यात ‘राम’ नाही असे म्हटले जाते. रामनामाचा जप करणे हे पुण्यकर्म समजले जाते. म्हणूनच ओळखीच्या व्यक्तीस वा अनोळखीलाही अभिवादन करताना ‘नमस्कार’च्या ऐवजी ‘राम राम’ असे म्हणण्याची जुनी परंपरा आहे. श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. प्रत्येक गावात श्रीराम मंदिर नसेल, पण प्रत्येक घरात रामभक्त नक्कीच मिळेल. म्हणूनच अनेक गावांमध्ये श्रीरामनवमीचा उत्सव साजरा होतो. श्रीरामाची महती अगाध आहे. हजारो वर्षांनंतरही रामनामाची जादू कायम आहे.

पर्यटन क्षेत्रात कोकणात – महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय आणि अनेक नामांकित पुरस्कारप्राप्त असलेला आमचा तारकर्ली गाव मागील 25 वर्षांपासून सर्वांनाच माहीत आहे, परंतु दरवर्षी ग्रामदैवत श्रीमहापुरुष मंदिरात होणारा श्रीरामनवमी उत्सव आणि त्या उत्सवानिमित्त (पूर्वी डझनभर तर आता नाटय़ प्रयोगासाठी येणारा प्रचंड खर्च आणि आता वाढलेली मनोरंजनाची साधने यामुळे मागील काही वर्षांत नाटय़प्रयोगांची संख्या कमी झाली आहे.) होणारी नाटके यासाठी तालुक्यात आमचा गाव मागील 65 वर्षांपासून खूप प्रसिद्ध आहे. गावातील चार-पाच मंदिरांमध्ये अनेक उत्सव साजरे होत असले तरी श्रीरामनवमी उत्सव हा येथील प्रमुख उत्सव होय. ग्रामदैवत श्रीमहापुरुष मंदिरात दरवर्षी श्रीरामनवमीचा उत्सव मोठय़ा थाटात, उत्साहात आणि भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा केला जातो. श्रीरामजन्माच्या वेळी मंदिरात, मंदिराच्या वरील सज्जात व परिसरात खूप गर्दी असते. मुलांना, महिलांना गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून मंदिराच्या माळ्याचा सज्जा त्यांच्याकरिता राखीव ठेवलेला असतो. श्रीरामजन्मानंतर सजवलेले ‘खांब’, ‘अब्दागीर’ यांसह पालखीची मनोहारी मिरवणूक काढली जाते. या हजारो भ्क्तांची दुपारी महाप्रसादाची सोय उत्सव समितीमार्फत केली जाते. या उत्सवास जणू जत्रेचे स्वरूप येते. तालुक्यातील कितीतरी दुकाने या ठिकाणी भाविकांच्या सेवेस तत्पर असतात. रामनवमीच्या रात्री व एकादशीच्या रात्री गावातील इतर मंदिरांत पालखी मिरवणुकीने नेऊन पुन्हा श्रीमहापुरुष मंदिरात आणली जाते. गावातील मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गात विद्युत रोषणाई केली जाते. श्रीरामनवमीपासून पुढे पाच दिवस मंदिरात कीर्तने होतात. येथेच हा उत्सव संपत नाही तर रामनवमीच्या रात्रीपासून रोज रात्री येथे कधी दशावतारी नाटक, कधी पौराणिक-ऐतिहासिक -सामाजिक नाटक तर कधी समूह नृत्यांचे असे विविध प्रकारचे कार्यक्रम असतात. (पूर्वी दर दिवसाआड म्हणजे रात्री दहा-बारा नाटके होत असत, पण आता त्यात बदल होऊन दररोज रात्री नाटक वा इतर कार्यक्रम होतात.) गावात हौशी तरुणांची काही नाटय़ मंडळे आहेत तसेच गावातील नोकरीनिमित्त मुंबई ठाण्यात राहणाऱया काही हौशी तरुणांचीही नाटय़ मंडळे आहेत. यातील एक ‘नाटय़ झुंजार, तारकर्ली’ या मंडळाने 2015 मध्ये आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले. सुवर्ण महोत्सव साजरा करणारे कोकणातील नव्हे, तर महाराष्ट्रातील हे एकमेव नाटय़ मंडळ असेल. ‘आराध्य फाऊंडेशन’ या संस्थेने नाटय़ झुंजारचा सुवर्ण महोत्सवानिमित्त खास पुरस्कार देऊन गौरव केला, तर ही नाटय़ मंडळे आपले नाटय़प्रयोग रामनवमीनिमित्त हिरीरीने सादर करतात. या नाटकांना तारकर्ली गावातील नाटय़प्रेमींबरोबरच आजूबाजूच्या गावातील दर्दी नाटय़प्रेमी गर्दी करतात. नाटय़ झुंजारने केलेले काही नाटय़प्रयोग बिदागी घेऊन इतर गावात झालेत तसेच मुंबईतही सशुल्क प्रयोग झालेत. सारीच नाटय़ मंडळे दर्जेदार नाटके सादर करतात. गेली 28 वर्षे श्री माघी गणेशोत्सवानिमित्तही तारकर्ली येथे नाटय़स्पर्धा घेतली जाते. सदर स्पर्धेत महाराष्ट्राच्या अनेक जिह्यांतून व गोवा राज्यातील नाटय़ मंडळे भाग घेतात. असे हजारो नाटय़प्रयोग तारकर्ली गावी झालेले असल्याने, होत असल्याने महाराष्ट्रात तारकर्ली हे ‘नाटय़वेडे गाव’ अशी ख्याती आहे. ‘अखिल तारकर्ली ग्राम विकास मंडळ, मुंबई’ व तारकर्ली शाखा गावच्या विकासासाठी मागील 65 वर्षांहून अधिक काळ झटत आहेत.

1957 साली तारकर्ली श्रीरामनवमी उत्सवास सुरुवात झाली. 2020 आणि 2021 ही दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे हा उत्सव मोजक्या ग्रामस्थांनी परंपरा म्हणून साजरा केला. तारकर्ली श्रीरामनवमी उत्सवाचे हे 66 वे वर्ष आहे आणि यंदा हा उत्सव अधिक उत्साहात, गर्दीत, भक्तिभावाने साजरा होणार आहे. या वर्षी तीन नाटय़प्रयोग सादर केले जाणार आहेत. तारकर्लीच्याच नव्हे, तर कोकणच्या वैभवात भर घालणारा हा उत्सव निश्चितच आहे.