कुडाळ तालुक्यात 16 रोजी बंधारा दिवस, 1 हजार बंधारे बांधण्याचे नियोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ 

कुडाळ तालुक्यात लोकसहभाग व श्रमदानातुन एक हजार बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी  कुडाळ तालुक्यात बंधारा दिवस साजरा करण्यात येणार असून या दिवशी एकाच वेळी 500 बंधारे बांधण्यात येणार आहे. याचा शुभारंभ पावशी-मिटक्याचीवाडी येथे करण्यात येणार असल्याची माहिती कुडाळ पं.स.चे सभापती राजन जाधव व गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.

कुडाळ पं.स.च्या सभापती दालनात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत सभापती श्री. जाधव व गटविकास अधिकारी श्री. चव्हाण बोलत होते. कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, बाळकृष्ण परब, डि.जी. आंबेरकर, महादेव खरात, सखाराम सावंत, रतन कदम आदी उपस्थित होते.

उन्हाळ्यात उद्भवणार्‍या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी हे बंधारे फायदेशीर ठरणार आहेत. गतवर्षी एकाच दिवशी 369 बंधारे लोकसहभागातुन बांधण्यात आले होते. तालुक्यात दरवर्षी लोक सहभागातुन कच्चे व वनराई बंधारे बांधले जातात. यावर्षीही 16 नोव्हेंबर रोजी तालुक्यात बंधारा दिवस साजरा केला जाणार आहे. यावेळी एकाच दिवशी तालुक्यातील सर्व पदाधिकारी सर्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी, ग्रा.पं.सरपंच,सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी व ग्रामस्थ, बचतगट, शेतकरी यांच्या सहभागातुन मोठ्या प्रमाणात बंधारे बांधुन बंधारा दिवस साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्राथमिक शाळा, हायस्कूल अंगणवाड्या, युवक क्रिडा मंडळे, बचतगट, स्वयंसेवी संस्था, विविध कर्मचारी संघटना यांचाही सहभाग असणार आहे असे श्री. जाधव व श्री. चव्हाण यांनी सांगितले.

कोणताही शासकीय निधी उपलब्ध नसताना तालुक्यात लोक सहभाग व श्रमदानातुन 1 हजार बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कच्चे बंधारे, वनराई बंधार्‍यां बरोबरच पाणथळ भातशेतीच्या खाचरातील पाणी अडवून तेथे ‘खरी बंधारा’ तसेच जेथे सिमेंट पिशव्या व मातीची कमतरता असेल अशा ठिकाणी दगड-धोंडे व प्लास्टिकचा वापर करून अभिनव असा ‘विजय बंधारा ’ बांधण्यात येणार आहे. बंधारे मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी 10 वाजता पावशी मिटक्याचीवाडी येथे जि.प. उपाध्यक्ष रणजित देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिश जगताप यांच्या उपस्थितीत होणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

या मोहिमेत तालुक्यातील सर्व पदाधिकारी अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन  सहकार्य करावे असे आवाहन सभापती जाधव, उपसभापती श्रेया परब, गटविकास अधिकारी चव्हाण व सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई यांनी केले आहे.