ऑक्सिजन वाहतुकीसाठी ‘टाटा’ आयात करणार क्रायोजेनिक कंटेनर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा देशात निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे. संकटकाळी देशाच्या मदतीसाठी तत्पर राहणाऱया टाटा उद्योग समूहानेही त्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी टाटा सन्स 24 क्रायोजेनिक कंटेनर्स आयात करणार आहे.

लिक्विड ऑक्सीजनची वाहतूक करण्यासाठी क्रायोजेनिक कंटेनर्स आवश्यक असतात. टाटा समूहाने या कंटेनर्ससाठी ऑर्डर दिली आहे. चार्टर्ड विमानाने ही कंटेनर्स आयात करण्यात येणार आहेत. टाटा समूहाने सोशल मिडियावरून त्याची माहिती दिली आहे. ‘देशातील ऑक्सीजनचा तुटवडा दूर करण्यासाठी आम्ही मदत करत आहोत. कोविडविरुध्दच्या लढयाला हातभार लावण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग म्हणून ऑक्सीजनचे संकट दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.’ असे टाटा समूहाने म्हटले आहे. यापूर्वी टाटा स्टीलच्या वतीने रोज 300 टन ऑक्सीजनचा पुरवठा करण्याची घोषणा करण्यात आली होती.