बोर्डाच्या परीक्षांच्या वेळा बदला; घराजवळचे परीक्षा केंद्र द्या, शिक्षक संघटनांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एप्रिल-मे महिन्यात राज्यात कडक उन्हाळा असल्याने दहावी-बारावी परीक्षांच्या वेळा बदला तसेच विद्यार्थ्यांना घराजवळच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याची परवानगी द्या, अशी मागणी राज्यातील शिक्षक संघटनांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा कोरोनामुळे यंदा एप्रिल-मे महिन्यात होत आहेत. राज्यभर या महिन्यात कडक उन्हाळा असतो. राज्यातील अनेक ठिकाणचे तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. त्यामुळे प्रचंड उकाडय़ात पेपर लिहिताना विद्यार्थ्यांना शारीरिक त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणांवर होऊ शकतो. अशा परिस्थितीत सकाळी लवकर परीक्षा घेणे फायद्याचे ठरेल, असे शिक्षक भारतीचे म्हणणे आहे. संघटनेने याविषयीचे निवेदन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिल्याचे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितले. शिक्षण विभागाने प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या राहत्या घराजवळच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी प्रा. मुकुंद आंधळकर यांनी केली.