
बीएलओ डय़ुटीसाठी निवृत्त कर्मचाऱयांची मदत घ्या, मुख्य निवडणूक अधिकाऱयांच्या सूचना
मुंबईतील शिक्षकांना लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची कामे त्याचप्रमाणे ऐन दहावी-बारावी परीक्षांच्या तोंडावर सुरू असलेल्या ‘बीएलओ’ कामातून वगळण्यात येणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी शिक्षकांव्यतिरिक्त निवडणूक कामाकरिता अन्य कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देता येईल का, तसेच बीएलओच्या कामासाठी इच्छुक निवृत्त सरकारी कर्मचाऱयांच्या सेवा घेता येतील का, याची चाचपणी करण्याच्या सूचना पालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱयांना दिल्या आहेत.
फेब्रुवारी ते एप्रिल हा कालावधी शैक्षणिकदृष्टय़ा महत्त्वाचा आहे. या कालावधीत विविध शाळांच्या परीक्षा घेण्यात येतात. त्यामुळे सरसकट शिक्षक वर्गाला निवडणूक कर्तव्यार्थ तसेच मतदार यादीच्या कामासाठी कायमस्वरूपी घेणे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारे ठरू शकते. निवडणुकीचे कामही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्थानिक प्राधिकारी संस्थेने तसेच सरकारने आवश्यक तो कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणे अनिवार्य असल्याचे निवडणूक कार्यालयाने स्पष्ट केले.
निवडणूक अधिकाऱयांची महापालिका आयुक्त, मुंबई शहर, उपनगरचे जिल्हाधिकारी यांच्यासोबत नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक कामासाठी शिक्षकांव्यतिरिक्त अन्य प्रवर्गातील कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देता येईल, असे ठरविण्यात आले. शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी राज्य शिक्षक सेनेदेखील निवडणूक अधिकाऱयांकडे केली होती. तसेच शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शिक्षकांना बीएलओ कामे देऊ नयेत, अशी मागणी केली होती.
शैक्षणिक कर्तव्यार्थ असलेल्या कोणत्याही कर्मचाऱयाला निवडणुकीची कामे शैक्षणिक दिवशी किंवा शैक्षणिक वेळी दिली जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिल्या आहेत.


























































