पराजयाकडून जयाकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मंगेश वरवडेकर

जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ सुरुवातीचे दोन सामने हरला तेव्हा साऱ्यांनीच बोंब सुरू केली होती, ऑस्ट्रेलिया संपली. त्यांना आता उपांत्य फेरी गाठणेही कठीण. काहींनी तर त्यांचं गाठोडं साखळीतच बांधून मेलबर्नला रवाना केलं होतं. पण हा वर्ल्ड कप आहे. इथे कधी कुणाची चालेल, काहीही सांगता येत नाही. तसंच काहीसं ऑस्ट्रेलियाबाबतीत घडतंय.

दोन पराभवांनी खचलेला ऑस्ट्रेलिया आता पेटून उठलाय. सलग चार सामने जिंकत त्याने उपांत्य फेरीच्या शर्यतीत आपलेही नाव सज्ज ठेवले आहे. त्यांचा खेळ पाहता ते उपांत्य फेरीत सहज पोहोचलेत. त्यांना आता कुणी ‘माई का लाल’ रोखू शकत नाही. वर्ल्ड कपमध्ये सनसनाटी निर्माण करणाऱया अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्याशी त्यांची लढाई लुटुपुटुची असेल आणि आव्हान संपलेल्या इंग्लंडशी ते खेळणार आहेत. आता ऑस्ट्रेलिया कुणालाही विजयाची भीक घालणार नाही हे नक्की!

शनिवारी न्यूझीलंडविरुद्धचा सामना पाहिल्यानंतर तर असं वाटलं की, ऑस्ट्रेलिया सुसाट आहे. भले न्यूझीलंडने सामना आपल्याकडे खेचला होता, पण ऑस्ट्रेलियाने तो पुन्हा आपल्याकडेच खेचून आणला. तेसुद्धा त्यांच्या अन्ननलिकेत हात घालून. या सामन्यात माझ्या दृष्टीने दोन्ही संघ जिंकले होते, पण विजयाचे दोन गुण ऑस्ट्रेलियाच्या पारडय़ात पडले.

डेव्हिड वॉर्नर ज्या फॉर्मात खेळतोय… असं वाटतं की, त्याला प्रारंभी रोखणे कठीण आहे. ऑस्ट्रेलियाने सलग तीन सामन्यांत 350 पेक्षा अधिक धावा करत अनोखा पराक्रम केलाय, आणि या पराक्रमात वॉर्नरचा वाटा सिंहाचा आहे. त्यांचे मिचेल मार्श, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन आणि ग्लेन मॅक्सवेल फॉर्मात आहेत असेही नाही; पण वॉर्नरच्या जोडीला कुणी ना कुणी उभा राहतोय. तेव्हाच तर सलग तीनदा ते 350 च्या पार पोचलेत.

पण सर्वात जबरदस्त दिसला ट्रव्हिस हेड. दुखापतीमुळे गेले पाच सामने बाहेर असलेला हेड आला आणि प्रतिस्पर्धी संघाचे हेडॅक त्याने वाढवले. पहिल्याच सामन्यात 109.

खरं सांगायचं तर ऑस्ट्रेलियन संघ सर्वात ताकदीचा आहे असं नाही. त्यांची फलंदाजीही सामान्य आहे आणि गोलंदाजीही. वॉर्नर सोडलं तर कुणातही सातत्य नाही. तसंच काहीसं झम्पाबद्दलही बोलता येईल. सलग तीन वेळा चार विकेट टिपणाऱ्या झम्पाने 16 विकेटस् घेतल्यात. पण त्यातील 15 विकेटस् त्याने गेल्या चार सामन्यांत टिपल्यात. म्हणजेच 4, 4, 4 आणि 3 अशी अफलातून कामगिरी झम्पाने केलीय. बाकी हेझलवूड असो किंवा स्टार्क, नाहीतर कमिन्स… कुणीही फारसा भेदक मारा करू शकलेले नाहीत. तरीही ते जिंकताहेत. का, तर त्यांची फलंदाजी धावांचा डोंगर उभारतेय. तीसुद्धा सातत्याने. त्यांच्या फलंदाजीत, गोलंदाजीत जे सातत्य नाही ते सातत्य त्यांच्या धावांचा हिमालय उभारण्यात आहे.

काल हिमालयाच्या साक्षीने त्यांनी धावांचा हिमालय उभारला आणि त्या हिमालयावर न्यूझीलंड विजयी पताका रोवणार, तोच ऑस्ट्रेलियाने निशामचे पाय खेचले. निशामचे कौतुकच करायला हवे. त्याची दुसरी धाव चुकली आणि त्यांचा विजयावरचा निशाणाही चुकला. ऑस्ट्रेलिया जिंकली. जणू हारी बाजी की जिंकावी तशी. ते आता म्हणतीलही, हारी बाजी को जीतना हमें आता है… एक फलंदाज आणि एका गोलंदाजावर ऑस्ट्रेलियन संघ उभाय, पण त्यांना कुणी ना कुणी साथ देतोय. विजयासाठी आणखी काय लागतं? या वेळचा ऑस्ट्रेलियन संघ वेगळा आहे. काहीही करू शकतो. जसजसे ते पुढे सरकताहेत, त्यांची ताकद वाढतेय. एक अंदाज बोलतोय, ज्या दोन संघांनी त्यांना हरवलंय, त्या पराभवाचा बदला ते याच स्पर्धेत घेण्यासाठी स्वतःला तयार करताहेत. समजनेवालों को इशारा काफी है…!