
एका षटकात 17 धावांचे जबर आव्हान असताना टीम डेव्हिडने जेसन होल्डरला सलग तीन षटकार ठोकत मुंबई इंडियन्सला ‘हजारात देखणा’ विजय मिळवून दिला. मुंबईने 213 धावांचे आव्हान 3 चेंडू आणि 6 विकेट राखून पार पाडत सोळाव्या आयपीएलमधील आपले आव्हानही जिवंत ठेवले.
मुंबईने आज आयपीएलचा ‘एक हजारावा’ सामना संस्मरणीय केला. राजस्थानच्या 213 धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या विजयात टीम डेव्हिडने 14 चेंडूंत 5 षटकार आणि 2 चौकार ठोकत धडाकेबाज कामगिरी केली. त्याने तिलक वर्मासह 62 धावांची अभेद्य भागी करत मुंबईला जिंकून दिले. तसेच सूर्यकुमार यादव (55), कॅमेरून ग्रीन (44) यांनी झुंजार खेळ केला होता.
त्याआधी यशस्वी जैसवालच्या 62 चेंडूंतील 124 धावांच्या एकाकी झंझावाती खेळीने राजस्थान रॉयल्सने 212 अशी मोठी धावसंख्या उभारून दिली होती. त्याने या खेळीत 16 चौकार आणि 8 षटकार खेचले. या खेळीव्यतिरिक्त राजस्थानचा एकही फलंदाज धावांची विशीसुद्धा ओलांडू शकला नाही.

























































