रोहित ब्रिगेडने ‘करून दाखवले’, टीम इंडियाकडून एकदिवसीय मालिकेत विंडीजचा 3-0 ने सफाया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या वन-डे मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघाने वेस्ट इंडीजला 3-0 अशी धूळ चारली आहे. आज रंगलेल्या तिसऱया वन-डेत टीम इंडियाने पाहुण्या संघाला 96 धावांनी पराभूत केले. वेस्ट इंडीज संघावर क्लीन स्वीप करीत विजय मिळवण्याचा इतिहास रोहित सेनेने या वन-डे मालिकेत रचला आहे. धडाकेबाज 80 धावा नोंदवणारा मुंबईकर श्रेयस अय्यर आणि नंतर विंडीजला झटपट गुंडाळणारे सिराज, प्रसीध आणि चाहर हे वेगवान त्रिकूट टीम इंडियाच्या या शानदार विजयाचे शिल्पकार ठरले.

तिसऱया आणि अखेरच्या वन-डेत रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 50 षटकांत हिंदुस्थानी संघाचा डाव 265 धावांवर आटोपला. आघाडीची फळी झटपट तंबूत परतल्यावर श्रेयस अय्यर (111 चेंडूंत 80) आणि ऋषभ पंत (54 चेंडूंत 56) यांनी धडाकेबाज अर्धशतके ठोकली. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा संघ 169 धावांपर्यंतच पोहोचू शकला. प्रसीध कृष्णा, दीपक चहर आणि मोहम्मद सिराज या हिंदुस्थानच्या वेगवान त्रिकुटाने जबरदस्त गोलंदाजी करत सामना टीम इंडियाच्या बाजूने झुकवला.

वेस्ट इंडियन फलंदाज टी-20च्या मूडमध्ये

50 षटकांच्या या लढतीत 266 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचे फलंदाज टी-20 लढतीच्या मूडमध्ये खेळताना दिसले. हिंदुस्थानने दिलेल्या 266 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजच्या संघाने आत्मघाती खेळ करीत यजमानांचा विजय सुकर केला. दीपक चहर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्ण, कुलदीप यादव यांनी केलेल्या प्रभावी माऱयापुढे वेस्ट इंडीजचा संघ 37.1 षटकांत 169 धावांमध्ये गारद झाला. सिराज, प्रसीध यांनी प्रत्येकी 3 तर चहर, यादव यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले. वेस्ट इंडीज कर्णधार निकोलस पूरन याची 34, तर ऑडीयन स्मिथ याची 36 धावांची खेळी वगळता वेस्ट इंडीजचे इतर फलंदाज पार अपयशी ठरले.

संक्षिप्त धावफलक

हिंदुस्थान ः 50 षटकांत सर्व बाद 265 (श्रेयस अय्यर 80, रिषभ पंत 56 ,वॉशिंग्टन सुंदर 33, दीपक चहर 38. जेसन होल्डर 34 धावांत 4 विकेट, अलझारी जोसेफ 54 धावांत 2 विकेट, हेडन वॉल्श 59 धावांत 2 विकेट)
विजयी वि. वेस्ट इंडीज ः 37.1 षटकांत सर्व बाद 169 (निकोलस पुरन 34, ऑडियन स्मिथ 36; मोहम्मद सिराज 29 धावांत 3 विकेट, प्रसीध कृष्ण 27 धावांत 3 विकेट, कुलदीप यादव 51 धावांत 2 विकेट, दीपक चहर 41 धावांत 2 विकेट)

टी-20 मालिकेसाठी हिंदुस्थानी संघ घोषित

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा उपकर्णधार के.एल. राहुल आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल यांना वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेतून वगळण्यात आले आहे. या दोन खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुडा यांचा या संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने ट्विट करीत ही माहिती आज दिली. हिंदुस्थान आणि केस्ट इंडीज यांच्यात 16, 18 आणि 20 फेब्रुकारी रोजी कोलकाता येथे तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे.

हिंदुस्थानी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अवेश खान हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुड्डा.