India Vs England Test Match दुसरी कसोटी जिंकून हिंदुस्थानची मालिकेत बरोबरी

इंग्लंडच्या बॅझबॉल आक्रमक वृत्तीच्या खेळात अखेर हिंदुस्थानने सरशी घेतली. हैदराबादमध्ये बसलेल्या हादऱ्यातून हिंदुस्थानने विशाखापट्टणममध्ये स्वतःला सावरले आणि अत्यंत चुरशीच्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला 106 धावांनी हरवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आज विशाखापट्टणम हिंदुस्थानी संघासाठी विजयापट्टणम ठरले. हिंदुस्थानी गोलंदाजांनी 399 धावांचा पाठलाग करणाऱया आक्रमक इंग्लंडला 292 धावांवर रोखले आणि हिंदुस्थानला शतकी विजय मिळवून दिला.

पहिल्या कसोटीवरही हिंदुस्थानचेच वर्चस्व होते, पण इंग्लंडच्या बॅझबॉलने शेवटच्या क्षणी हिंदुस्थानी गोलंदाजांवर मात करत थरारक विजय मिळवला होता. दुसऱया कसोटीतही पहिले तीन दिवस हिंदुस्थानचे वर्चस्व होते. काल हिंदुस्थानने इंग्लंडसमोर 399 धावांचे जबरदस्त आव्हान ठेवले होते. काल इंग्लंड 1 बाद 67 अशी दमदार सुरुवात केली होती आणि आज कालच्या नाईट वॉचमन म्हणून आलेल्या रेहान अहमदच्या साथीने झॅक क्राऊलीने 45 धावांची भागी रचली. रेहान बाद झाल्यावर पहिल्या कसोटीच्या विजयाचा शिल्पकार ऑली पोप झॅक क्राऊलीच्या साथीला फार वेळ उभा राहू शकला नाही. पण इंग्लंडच्या धावांचा वेग कायम होता. झॅकने 73 धावांची खेळी करताना इंग्लंडला धावांच्या पाठलागाच्या आसपासच ठेवले होते. इंग्लंड वेगाने 399 धावांच्या देशेने आगेकूच करत होता. पण दुसरीकडे त्यांच्या विकेटस्ही कोसळत होत्या. विकेटस् पडूनही त्यांनी आपली आक्रमक वृत्ती सोडली नाही.

बुमराने गेम फिरवला
बेन पह्क्स आणि टॉम हार्टलीच्या 55 धावांच्या भागीने इंग्लंडच्या पाठलागात जान ओतली होती. इंग्लंडचा बॅझबॉल पुन्हा जिंकतोय की काय अशी धाकधूकही वाढली होती; पण बुमराने ही जोडी पह्डून त्यांच्या प्रयत्नांनाही सुरुंग लावला. बुमराच्या भात्यातून निघालेल्या या चेंडूने बेनचा नेम घेत सामना फिरवला. पहिल्या डावात 6 विकेट घेणाऱया बुमराने पह्क्सला बाद करून इंग्लंडच्या पाठलागाला रोखले आणि मग टॉम हार्टलीचा त्रिफळा उद्ध्वस्त करत इंग्लंडचे हार्टब्रेक केले. बुमराच्याच चेंडूने इंग्लंडच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडच्या बॅझबॉल खेळाला विशाखापट्टणममध्ये अपेक्षित यश लाभले नसले तरी त्यांनी कसोटीच्या खेळात रंगत मात्र आणली. कसोटीत नऊ विकेटस् घेणारा बुमराच विजयाचा शिल्पकार ठरला. असं असलं तरी यशस्वीचे पहिल्या डावातील द्विशतक आणि दुसऱया डावात शुबमन गिलचे शतकही त्याच तोडीचे होते.

रोहित 296 व्या विजयाचा साक्षीदार
रोहित शर्माची कसोटीतील कामगिरी अपेक्षित झाली नसली तरी तो आज 296 व्या आंतरराष्ट्रीय विजयाचा साक्षीदार ठरला. त्याने धोनीच्या 295 विजयाच्या आकडय़ाला मागे टाकले. आता फक्त विराट कोहली (313) आणि सचिन तेंडुलकर (307) हे दोघेच रोहितच्या पुढे आहेत. हिंदुस्थानी क्रिकेटसाठी 200 पेक्षा अधिक विजयाचे साक्षीदार असलेल्या खेळाडूंच्या यादीत युवराज (227) आणि राहुल द्रविडचेही (216) नाव घेतले जाते.

बुमरा आदमचा चॅम्पियन
बुमरा आमचा खऱ्या अर्थाने चॅम्पियन खेळाडू आहे. जेव्हा तुम्ही अशा विजयाची नोंद करता तेव्हा तुमच्या पूर्ण कामगिरीची दखल घ्यावीच लागते. आम्ही फलंदाजीत चांगले होतो. या स्थितीत सामना जिंकणे सोपे नसते. आमच्या गोलंदाजांनी आणखी चांगली कामगिरी करत पुढे व्हावे अशी आमची इच्छा होती आणि त्यांनीही तसाच खेळ केला. बुमरा एक जबरदस्त खेळाडू आहे आणि तो आपल्या खेळाला चांगल्या प्रकारे ओळखून आहे. त्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्याच्याकडे संघाला देण्यासाठी खूप काही असल्याचे सांगत रोहितने बुमराच्या चॅम्पियन खेळाचे विजयानंतर कौतुक केले.

अश्विनच्या इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक विकेट्स
अश्विनने इंग्लंडचे तीन विकेटस् टिपत त्यांच्याविरुद्ध आपल्या विकेटस्चा आकडा 97 वर नेला आणि तो हिंदुस्थानकडून सर्वाधिक विकेटस् घेणारा गोलंदाज ठरला. याआधी चंद्रशेखर यांनी 95 विकेटस् टिपल्या होत्या. मात्र अश्विन या कसोटीत आपल्या कसोटी विकेटस्चे पंचशतक साजरे करू शकला नाही. तो फक्त 4 विकेटस् दूर होता. त्याला पहिल्या डावात एकही विकेट टिपता आली नाही आणि दुसऱया डावात त्याने केवळ 3 विकेटस्च मिळवल्या. आता तिसऱया कसोटीत तो आपला पाचशेवा कसोटी बळी टिपेल. एक विकेट टिपताच तो 500 कसोटी विकेट घेणारा पुंबळेनंतर दुसरा हिंदुस्थानी आणि जगातला नववा गोलंदाज ठरेल. सध्या खेळत असलेल्या गोलंदाजांमध्ये अॅण्डरसन (695), नॅथन लायन (517) हेच दोन गोलंदाज अश्विनच्या पुढे आहेत. तसेच अश्विन वेगवान 500 विकेटस् घेणारा दुसरा गोलंदाज ठरेल. मुरलीधरनने 87 व्या कसोटीत हा पराक्रम केला होता, तर अश्विन 98 व्या कसोटीत मान मिळवेल. याव्यतिरिक्त अन्य सातही गोलंदाजांनी 105 पेक्षा अधिक कसोटीनंतर हा टप्पा गाठला आहे.