टी२० स्पर्धेत जबराट विजय! लिंबू-टींबू आयर्लंडचा १४३ धावांनी पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, डब्लिन

आंतरराष्ट्रीय  टी२० स्पर्धेत सर्वाधिक फरकाने प्रतिस्पर्ध्याचा पराभव करणाऱ्या संघाच्या यादीत हिंदुस्थान पहिल्या क्रमांकावर आला आहे. हिंदुस्थानी संघाने प्रथम फलंदाजी करताना धावफलकावर २१३ धावांचा डोंगर उभारला होता, त्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ फक्त ७० धावांवर बाद झाला.

१२.३षटकांमध्ये आयर्लंडचा डाव आटोपला. के.एल. राहुल (३६ चेंडू, ७० धावा) सुरेश रैना (४५ चेंडू, ६९ धावा) आमि हार्दीक पांड्या (९ चेंडू ३२ धावा) या तिघांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर हिंदुस्थानी संघाने २१३ धावा केल्या. या सामन्यात विराट कोहली ९ धावांवर बाद झाला तर रोहित शर्माला  या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही.

आयर्लंडचा गोलंदाज सिमि सिंग हा सगळ्यात महागडा गोलंदाज ठरला, त्याने टाकलेल्या २ षटकात ३२ धावा हिंदुस्थानी फलंदाजांनी वसूल केल्या. त्याला २ षटकांनतर कर्णधाराने त्याला चेंडू सोपवण्याचं धाडस दाखवलं नाही. हिंदुस्थानी संघाच्या गोलंदाजांनी मात्र आयर्लंडच्या फलंदाजांना चांगलंच जखडून ठेवलं होतं. सिद्धार्थ कौलने तर २ षटकात फक्त ४ धावा देत एक बळी टीपला. यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी ३ बळी टीपले. उमेश यादवने २ बळी घेतले तर हार्दीक पांड्याने १ बळी घेतला.

आयर्लंडचे तीनच फलंदाज असे होते ज्यांना दुहेरी धावसंख्या करता आली. इतर सगळे फलंदाज एकेरी धावसंख्येवरच बाद झाले. सलामीवीर पॉल स्टर्लिंगसह तीन फलंदाज असे होते ज्यांना भोपळाही फोडता आला नाही.