Ind Vs England Test Match -हिंदुस्थानचा गोऱ्यांवर रोमहर्षक विजय; ओव्हलवरील कमाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

आपण विजयाच्या मार्गावर आहोत आणि डेडलाइन गाठण्यासाठी मी लेखणी उचलली. एक गोष्ट सुरुवातीलाच मान्य करूया. आपला संघ लढवय्या आहे. तो लढला आणि तो आता लढून जिंकतोय.

क्रिकेटप्रेमी व आमच्यासारखे स्वनियुक्त समीक्षक मागल्या सामन्यातील निकालावरून आपले आडाखे बांधत असतात अन् इथे मागल्या सामन्यात आपला डावानं पराभव झाला होता. फार ससेहोलपट झाली होती. पहिला डाव अवघ्या 78 धावांत संपला होता.

याही खेपेला आपला पहिला डाव 191 धावांत संपला होता. ठाकूर व पंत यांनी लढाऊ अर्धशतके काढली नसती तर लीडस्च्या कामगिरीची केविलवाणी पुनरावृत्ती अशक्य नव्हती. पण आपले खेळाडू झगडतात, लढतात, झुंजतात आणि विजयश्री नेहमीच लढवय्यांच्या गळ्यात हार घालते.

पहिल्या डावात 100 धावांनी पिछाडीला पडल्यावर हिंदुस्थानी संघानं जो खेळ केला तो बघण्यासारखा होता. दुसऱया डावात त्यांनी चक्क चारशे धावांचा टप्पा ओलांडला. राहुल, रोहित शर्मा, पुजारा, ठाकूर, पंत सगळे खेळले. ते अॅण्डरसनला जुमानत नव्हते की वोक्सला. विकेट कशीही असो तिच्यावर टिच्चून उभ राहणं तुमच्या जिगरीवर अवलंबून असतं. रोहित शर्माचं झुंजार शतक तो तर विसरणार नाहीच पण आपणही विसरणार नाही. ठाकूर काय खेळतो हो. तो सणसणीत ‘क्रिकेटिंग शॉटस्’ मारत होता. पंतनं आपली आत्मघातक आक्रमक फलंदाजी बराच काळ कह्यात ठेवली. यालाच संघासाठी खेळणं म्हणतात ना?

त्यानंतरही दुसऱया डावात 368 धावा करून सामना जिंकणं इंग्लंडच्या आवाक्यातलं वाटतं होतं. विकेट वेगवान गोलंदाजांसाठी हा मुर्दाड झाल्ये असे गोरे समालोचक वारंवार सांगत होते. ती म्हणे, त्यातल्या त्यात फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल होती आणि हिंदुस्थानकडे अश्विन नव्हता. मग बलाढय़ इंग्लिश फलंदाजी बाद करणार कोण? शूअरली नॉट जडेजा.

त्यानंतर चमत्कार पाहायला मिळाला. बुमराह काय करू शकतो, हे त्यानं पुन्हा एकदा दाखवलं. विकेट कशीही असूदे हो, यॉर्करला तुम्ही काय करणार? अशाच एका भन्नाट यॉर्करवर बुमराहनं बेअरस्टोला क्लीन बोल्ड काढला. तत्पूर्वी एका अतिवेगवान इन्स्विंगवर त्यानं पोपचा त्रिफळा उद्धवस्त केला. ती त्याची कसोटीची 100वी विकेट होती. मुद्दा काय, तर गुणी वेगवान गोलंदाज मुर्दाड विकेटही जिवंत करू शकतो.

मलान, बेअरस्टो, पोप व मोईन अली ही मधली फळी मिळून सात धावा करू शकली. त्यातले बेअरस्टो व मोईन अली शून्य. जडेजा नेहमीपेक्षा मारक वाटत होता. जणू तो अश्विनची उणीव फारशी भासू न देण्याचा आपल्याकडून प्रयत्न करीत होता. पॅव्हेलियनमध्ये सर्वांपासून दूर एकटाच बसलेला अश्विन हात चोळत असेल एवढं निश्चित.

टीव्हीची गंमत बघा. इंग्लंडला विजयासाठी 221 धावा हव्यात असं सांगणारा टीव्ही इंग्लंडच्या सहा विकेटस् 150मध्ये गेल्यावर लगेच टोपी फिरवून सांगू लागला आणि आता हिंदुस्थानला जिंकण्यासाठी 4 विकेटस् हव्यात.

ठाकूरनं रूटचा अडसर दूर केला व इंग्लंडचा उरलासुरला विरोध मावळला. हा ठाकूर बेटा कामाचा गडी ठरतोय. दोन्ही डावांत अर्धशतके व नंतर आघाडीचा बर्न्स (50) व कर्णधार रूट (36) यांना माघारी धाडले. आणि काय हवं?

आता पाचव्या लढतीपूर्वी विराट कोहलीपुढे हे प्रश्न आहेत – शमीला कोणाच्या जागी परत आणायचं? अश्विनला घ्यायचं का, व घ्यायचं झाल्यास कोणाच्या जागी घ्यायचं? ‘विनिंग कॉम्बिनेशन’ बदलायचं नाही या बहाण्याखाली उपकर्णधार अजिंक्य रहाणेला संघात ठेवायचं का? मात्र तिसऱया सामन्यातील दारुण पराभवानंतर हिंदुस्थानचा ओव्हलवरच्या चौथ्या कसोटीतील विजय निश्चितपणे देशाच्या फेटय़ात मानाचा तुरा गणला जाईल. शिवाय आपण समजा मालिका जिंकलो तर केवळ वेगवान गोलंदाजांच्या बळावर जिंकलेली ही पहिली मालिका असेल.