Ind Vs WI – हिंदुस्थान-विंडीज तिसरी वन डे आज, बेंचवरील खेळाडूंना मिळणार संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाने वेस्ट इंडीजचा सलग दोन सामन्यांत पराभव करून एकदिवसीय क्रिकेट मालिका आधीच खिशात टाकल्याने कर्णधार रोहित शर्मा निश्चिंत झाला आहे. त्यामुळे उभय संघांमध्ये उद्या शुक्रवारी होणाऱया तिसऱया व अखेरच्या अनौपचारिक सामन्यात बेंचवरील (राखीव) खेळाडूंना संधी देण्यासाठी रोहित मोकळा झाला आहे. संघात किमान चार ते पाच बदल अपेक्षित आहेत.

चहलच्या जागेवर कुलदीपला संधी?

फिरकी गोलंदाजीमध्ये युजवेंद्र चहलच्या जागेवर ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादवला खेळविले जाऊ शकते. कुलदीपचे प्रदीर्घ काळानंतर वन डे क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले असून मालिका आधीच जिंकल्यामुळे त्याला संधी मिळणे जवळपास पक्के समजले जात आहे. चहलने दोन वन डेत 5 बळी टिपले असून त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. दुसरा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत असेल.

वेगवान ताफ्यातही बदल अपेक्षित

वेगवान गोलंदाजी ताफ्यातही मोहम्मद सिराज व शार्दुल ठाकूर यांच्याऐवजी आवेश खान व दीपक चाहर यांना संधी मिळणे अपेक्षित आहे. आवेशने स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण केलेली आहे. त्याच्या गोलंदाजीत वेग असून नव्या चेंडूवर बळी टिपण्यात तो माहीर आहे. त्यामुळे सिराजच्या जागेवर संधी मिळाल्यास आवेशचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण होऊ शकते. दीपक चाहरने दक्षिण आफ्रिका दौऱयावर 2 बळी टिपले होते. शिवाय त्याने 54 धावाही केल्या होत्या.

धवन की ऋतुराज?

शिखर धवन व ऋतुराज गायकवाड या सलामीच्या फलंदाजांना कोरोना झाल्याने सलामीच्या लढतीस मुकावे लागले होते. दुसऱया सामन्यात या दोघांनाही संधी मिळाली नव्हती. मात्र उद्याच्या लढतीत या दोघांपैकी कोणाला संधी मिळते ते बघावे लागेल. पहिल्या सामन्यात ईशान किशन व दुसऱया लढतीत रिषभ पंतला सलामीवीराची भूमिका मिळाली होती, मात्र दोघांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱयावर चांगली कामगिरी करणाऱया शिखर धवनला अखेरच्या एकदिवसीय लढतीत संधी मिळू शकते. धवनचे पारडे जड असल्याने मराठमोळ्या ऋतुराजला अजूनही बेंचवरच बसावे लागेल असे वाटते.

किशनला यष्टिरक्षक म्हणून खेळविणार

विराट कोहली, लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव तीन ते पाच क्रमाकांवर खेळतील. रिषभ पंतला आराम देऊन ईशान किशनला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळविले जाण्याची शक्यता आहे. ईशानने पहिल्या सामन्यात सलामीला खेळताना 28 धावांची खेळी केली होती. पंतने दोन लढतींत 14.50च्या सरासरीने केवळ 29 धावा केलेल्या आहेत. शिवाय तो सातत्यपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय. त्यामुळे पंतला विश्रांती देऊन ईशानला संधी मिळू शकते.

हिंदुस्थानचा संभाव्य संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, आवेश खान, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा.