IndVsEng हिंदुस्थानची मालिका विजयाची धुळवड, इंग्लंडचा धुव्वा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि इंग्लंड या दोन्ही देशांमधील एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत तिसऱ्या दिवशी हिंदुस्थानने विजयाची धुळवड खेळली आहे. हा हिंदुस्थानचा सलग सहावा मालिका विजय असून सलग 36 वर्षं मायभूमीत इंग्लंडकडून पराभूत न होण्याचा हिंदुस्थानचा विक्रम कायम राहिला आहे.

जागतिक क्रमवारीत आघाडीवर असणाऱ्या या दोन संघांमध्ये पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर ही मालिका रंगली. होळीच्या दिवशी या एकदिवसीय मालिकेचा तिसरा आणि अखेरचा सामना रंगला. अतिशय चित्तथरारक अशा खेळीत हिंदुस्थानने 2-1 अशा फरकाने सामना जिंकत मालिका खिशात घातली.

हिंदुस्थानने आज प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडपुढे 330 धावांचे लक्ष्य ठेवले होते. शिखर धवन, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्या अर्धशतकी खेळ्यांमुळे हिंदुस्थानला तीनशेपार पोहोचता आले.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. भुवनेश्वर कुमारने जेसन रॉयला 14 धावांवर बाद केलं. त्यानंतर आधीच्या सामन्यात शतकी खेळी केलेल्या जॉनी बेअरस्टोला वैयक्तिक एका धावेवर पायचित बाद करण्यात आलं.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या डेव्हिड मलान आणि बेन स्टोक्सकडून इंग्लंडला चांगल्या भागीदारीची अपेक्षा होती. मात्र, नटराजनच्या गोलंदाजीवर स्टोक्स झेलबाद झाला. त्याने 35 धावा केल्या. स्टोक्सनंतर आलेला बटलरही काही खास कामगिरी करू शकला नाही. शार्दुल ठाकूरने त्याला 15 धावांवर पायचित केलं. त्यानंतर डेव्हिड मलान, मोईन अली हे फलंदाजही फारशी भर न टाकता बाद झाले.

त्यानंतर आलेल्या सॅम करन याने आधी मोईन अली, आदिल राशिद आणि नंतर मार्क वूड यांच्या साथीने इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तसंच आपलं एकदिवसीय कारकिर्दीचं पहिलं अर्धशतकही पूर्ण केलं. 49व्या षटकात हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर हिंदुस्थानकडून दोन झेल सुटले. शेवटच्या षटकात इंग्लंडला 14 धावांची गरज होती. नटराजनने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर दुसरी धाव घेताना मार्क वूड धावबाद झाला.

हिंदुस्थाने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. टीम इंडियाला यावेळी शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर 103 धावांची सलामी मिळाली होती. पण त्यानंतर मात्र टीम इंडियाने 54 धावांमध्ये चार फलंदाज गमावले आणि संघाची अवस्था 4 बाद 157 अशी अवस्था झाली होती.

त्यानंतर आलेल्या पंतने धमाकेदार फलंदाजी केली आणि त्यामुळेच हिंदुस्थानला डाव सावरत धावफलक हलता ठेवता आला. पंतला यावेळी हार्दिक पंड्याची चांगली साथ मिळाली. हार्दिकने यावेळी 64 धावांची खेळी साकारली.