टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा फ्लॉप शो; जाहिरातदारांचा ‘गेम’ फसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाच्या आखातातील टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील टीम इंडियाच्या फ्लॉप शोने हिंदुस्थानच्या लाखो क्रिकेटशौकिनांना धक्का बसलाय. पबसोबतच हिंदुस्थान उपांत्य फेरीपर्यंत जाणार अशा अपेक्षेने हजारो कोटी रुपये टीव्ही जाहिरातींवर लावणाऱया जाहिरातदारांचा बोऱया वाजण्याची वेळ आली आहे. कारण बाद फेरीत टीम इंडिया नाही म्हटल्यावर जगभरातील लाखो हिंदुस्थानी क्रिकेटरसिकांनी उर्वरित विश्वचषक लढतींकडे चक्क पाठ फिरवली आहे.

यंदाच्या  टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया किमान उपांत्य फेरीत मजल मारणार असा जाहिरात पुरस्कर्त्यांचा होरा होता. पण सुपर 12 फेरीनंतर या जाहिरातदारांची पार निराशा झाली. कारण हिंदुस्थानी संघाचे आव्हान सुपर 12 गटातच संपुष्टात आले. त्यामुळे टीव्हीवर या विश्वचषक लढती पाहणाऱया प्रेक्षकांची संख्या प्रचंड प्रमाणात घातली. कारण या लढती पाहणारे मोठय़ा संख्येने हिंदुस्थानी क्रिकेटशौकीनच होते. या स्पर्धेत आपल्या जाहिरातींना मोठा प्रेक्षक मिळेल या विश्वासाने सुमारे 16  पुरस्कर्त्या कंपन्यांनी स्टार टीव्हीशी आणि 10 कंपन्यांनी डिस्ने-हॉटस्टारशी सुमारे 1200 कोटी रुपयांचा करार केला आहे. आता प्रेक्षक कमी झाले तरी य पुरस्कर्त्यांनी जाहिराती मागे घेणे शक्य नाहीय. कारण प्रेक्षकसंख्येवर जाहिरातीचे दर अवलंबून नसतात, असे इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे.

  दृष्टिक्षेप टीव्हीआरकडे

  • हिंदुस्थान वि. पाकिस्तान -8.71 टीव्हीआर
  • पाकिस्तान वि. न्यूझीलंड – 2.17 टीव्हीआर
  • पहिल्या 12 लढतींचा सरासरी टीव्हीआर – 1.81
  • लढतींसाठी जाहिरात दर -9 ते 9.5 लाख रुपये प्रति 10 सेकंद
  • अन्य स्पर्धांसाठीचा दर – 2 ते 3 लाख रुपये प्रति 10 सेकंद

सुपर 12 फेरीतील हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीवर साडेसोळा कोटी प्रेक्षकांची उडी

यंदाच्या टी 20 विश्वचषकातील सुपर 12 गटातील पहिल्या 12 लढतींना प्रेक्षकांचा अमाप प्रतिसाद लाभला. त्यामुळे या काळातील जाहिरातींसाठी करार करणाऱया कंपन्यांचे नुकसान होणार नाही. मात्र आता पुढच्या लढतीचे टीव्ही रेटिंग जे प्रेक्षकांच्या संख्येवर अवलंबून असते ते पार घसरले आहे. टीम इंडियाची स्पर्धेतील गच्छंती हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. सुपर 12 तील  हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट लढतीवर जगभरातील सुमारे 16 कोटी 67 लाख क्रिकेटशौकिनांनी उडी घेतली होती. या लढतीचा टीव्ही रेटिंग (टीव्हीआर )  होता 8.71; मात्र त्यानंतरच्या पाकिस्तान-न्यूझीलंड लढतीला केवळ 2.17 इतकीच टीव्ही रेटिंग मिळू शकली होती. आता पुढच्या लढतींत टीम इंडिया नसल्याने या स्पर्धेतील लढतीचा टीव्हीआर 2 टक्क्यांच्याही खाली आला आहे. त्यामुळे आधीच जाहिरातीत पैसे गुंतवणाऱया जाहिरातदारांची पार गोची झाली आहे.