लालूंच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पोस्टरही झळकलं!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

चारा घोटाळ्याप्रकरणी सध्या जेलचा पाहुणचार करत असलेले राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मुलगा लवकरच बॉलिवूडमध्ये झळकण्याची चिन्ह आहेत. त्यासाठी तो रोज जिममध्ये जाऊन घाम गाळत असल्याचंही समोर येत आहे. तसंच त्याने आपल्या ट्विटर हँडलवरून त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टरही पोस्ट केलं आहे.

काही काळापूर्वीच चतुर्भूज झालेला लालु प्रसाद यादव यांचा मुलगा आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून त्याच्या आगामी ‘रुद्रा – द अवतार’ या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये तेजप्रताप यांचा गॉगल घातलेला फोटोही झळकताना दिसत आहे. नावावरून हा चित्रपट शिवभक्तावर आधारित असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. या चित्रपटासाठी आपली शरीरयष्टी बनवण्यात तेजप्रताप व्यग्र असून त्यासाठी ते दररोज जिममध्ये घाम गाळत असल्याचे फोटोही व्हायरल होत आहेत.

राजकारणापेक्षा चित्रपटांमध्ये अधिक स्वारस्य असलेल्या तेजप्रताप यांनी यापूर्वीही एका भोजपुरी चित्रपटात काम केलं आहे. पण, दुर्दैवाने तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. आता बॉलिवूडमध्ये त्यांना किती यश मिळतं ते पाहण्यासारखं असणार आहे.