दिवसा लाहीलाही, सकाळी गारवा; मुंबईत दबक्या पावलांनी थंडीची एंट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडय़ाने त्रस्त झालेले मुंबईकर सकाळच्या सुमारास दबक्या पावलांनी एंट्री केलेल्या थंडीमुळे सुखावले आहेत. मुंबई शहर व उपनगरांत दिवसाची लाहीलाही कायम आहे.

मात्र रात्री आणि सकाळी तापमानाचा पारा घसरणीला लागला आहे. येत्या आठवडय़ात थंडीची तीव्रता वाढेल आणि दिवसाच्या तापमानातही घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार लवकरच मुंबईकरांना उकाडय़ापासून मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईत गेले काही दिवस उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत. मान्सूनने अचानक काढता पाय घेतला. त्यात थंडीचे आगमन लांबले होते. वाढलेल्या उकाडय़ामुळे मुंबईकरांची दिवसरात्र खूप दमछाक होत होती. याचदरम्यान वीकेण्डला मुंबई शहर व उपनगरांतील किमान तापमानाचा पारा उतरणीला लागला आहे. थंडी दबक्या पावलांनी मुंबईकरांच्या कुशीत शिरली आहे. एकीकडे दिवसाचा पारा अजून चढताच असला तरी पहाटेच्या गारव्यामुळे उकाडय़ाचा ताप कुठच्या कुठे पळला आहे. पुढील दोन दिवसांनंतर पारा वेगाने घसरणीला लागेल आणि मुंबईकरांना गुलाबी थंडीची अनुभूती घेता येईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

रविवारी सांताक्रुझमध्ये कमाल तापमान 37 अंशांच्या विक्रमी पातळीवर झेपावले होते, तर कुलाब्यामध्ये कमाल तापमानाचा पारा 36 अंशांवर गेला होता. याचवेळी किमान तापमान 21 अंशांच्या आसपास होते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या आठवडय़ात थंडीची तीव्रता वाढेल आणि किमान तापमानाची पातळी 20 अंशांच्या खाली जाईल.