
देशात यंदा उकाडय़ाने रेकॉर्डब्रेक कहर केला आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे मार्चमध्ये पाऱयाने थेट शतकातील विक्रमी पातळी गाठली आहे. मार्च हा मागील तब्बल 121 वर्षांतील तिसऱया क्रमांकाचा सर्वाधिक उष्ण महिना ठरला आहे. हवामानशास्त्र विभागाने सोमवारी ही माहिती दिली. तसेच एप्रिल आणि मे महिन्यात उकाडय़ाचा ताप आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
हवामानशास्त्र विभागाकडून दर महिन्याला सरासरी किमान आणि कमाल तापमानाचा आढावा घेण्यात येतो. मार्चमध्ये घेतलेल्या आढाव्यातून तापमानाची रेकॉर्डब्रेक नोंद समोर आली आहे. हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार यंदा मार्चमध्ये 32.65 अंश सेल्सिअस इतके कमाल तर 19.95 अंश सेल्सिअस इतके किमान सरासरी तापमान नोंद झाले. याआधी 1981 व 2010 साली कमाल 31.24 अंश सेल्सिअस आणि किमान 18.87 अंश सेल्सिअस इतक्या सरासरी तापमानाची नोंद झाली होती. यंदा पुन्हा सरासरी तापमानात विक्रमी वाढ झाल्यामुळे पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे. गेल्या महिन्यात अनेकदा देशाच्या विविध भागांत पारा 40 अंशांच्या पुढे गेला होता. याआधी 2010 आणि 2004 मध्ये अनुक्रमे 33.09 आणि 32.82 असे सरासरी तापमान नोंद झाले होते, असे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.
महाराष्ट्रासह देशभर उष्णतेचा कहर कायम
एप्रिल उजाडल्यानंतरही महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर उष्णतेचा कहर कायम आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी 76 वर्षांतील सर्वाधिक 40.1 अंश कमाल तापमान नोंद झाले. त्याचबरोबर महाराष्ट्रात विदर्भ, कोकण परिसरात उष्णतेची लाट आहे. सोमवारी परभणी, जालना, कोल्हापूर, बारामती, जळगाव, बीड आदी ठिकाणी 40 ते 41 अंश तापमान नोंद झाले.




























































