
कृष्ण जन्मभूमी खटल्यातील एका याचिकाकर्त्याने बुधवारी येथील श्री कृष्ण जन्मस्थान मंदिरातील देणग्यांच्या व्यवस्थापनात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आणि सीबीआय (CBI) चौकशीची मागणी केली आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरातील देणगीशी संबंधित ‘घोटाळ्यासारखीच’ परिस्थिती येथेही घडतेय, असा दावा त्यांनी केला.
श्री कृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास या संघटनेचे अध्यक्ष असलेले दिनेश फलाहारी महाराज यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रात असा आरोप केला आहे की, श्री कृष्ण जन्मस्थान येथे भाविकांनी अर्पण केलेली देणगीची रक्कम आणि दागिने यांचा अनेक वर्षांपासून अपहार केला जात आहे. देणग्यांच्या मोजणीदरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले जातात, असा आरोप त्यांनी केला. तसेच कमिटीच्या सदस्यांनी स्वतःची वैयक्तिक संपत्ती जमा केली असून यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावाही त्यांनी केला.
‘आम्हाला भीती आहे की श्री कृष्ण जन्मस्थान येथेही अशाच प्रकारचे गैरव्यवहार होत आहेत. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे’, असे ते म्हणाले. ही मागणी मान्य न झाल्यास आपण प्रयागराज उच्च न्यायालयात दाद मागू, असेही त्यांनी पुढे सांगितले. तर, श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थानचे सचिव कपिल शर्मा यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मंदिर प्रशासनाकडून देणग्या हाताळण्यासाठी पारदर्शक पद्धतीचा वापर केला जातो आणि आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहेत, असे ते म्हणाले.
‘हे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत. आम्ही कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत’, असे शर्मा यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले. त्यांनी सांगितले की, देणगी मोजण्याची प्रक्रिया ही सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आणि तीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत केली जाते. या प्रक्रियेत वर्षभर कर्मचाऱ्यांना बदलले जाते आणि याचे रेकॉर्डिंग देखील जपून ठेवले जाते. ‘आम्ही ही यंत्रणा अधिक अद्ययावत करत आहोत आणि सीसीटीव्ही रेकॉर्डिंग जास्त काळासाठी सुरक्षित ठेवू’, असे ते म्हणाले.
शर्मा यांनी सांगितले की मंदिराबाहेर कोणतेही देणगी काउंटर नाही आणि सर्व देणग्या केवळ मंदिर संकुलाच्या आतच स्वीकारल्या जातात. ते पुढे म्हणाले की भाविकांची सुरक्षा तपासणी केली जाते आणि त्यांना आत पाकीट, हार, प्रसाद किंवा मोबाईल फोन नेण्याची परवानगी नसते. यामुळे कोणालाही मोठी रक्कम किंवा दागिने आत घेऊन जाणे कठीण होते.
सचिव शर्मा यांनी असेही सांगितले की, मंदिर प्रशासन ५,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेचे रोख पेमेंट करत नाही, आणि मंदिराच्या देणगी व्यवस्थापनाबाबत आयकर विभागाकडून कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहाराची एका तीन सदस्यीय विशेष तपास पथकाने नुकतीच चौकशी सुरू केली आहे.


























































