
भाडोत्री त्यात चांगला कारागीर आहे म्हणून घरमालकाने जुने सहा तोळ्याचे दागिने व 45 हजार मजुरी देऊन नवीन दागिने बनवून देण्यास सांगितले. पण त्या कारागीराने घरमालकाचा विश्वासघात करत थेट पश्चिम बंगालमधले गाव गाठले. त्यात लॉकडाऊन सुरू झाल्याने आता कोण पकडत नाही अशा विचारात तो होता. मात्र शिवाजी पार्क पोलिसांनी त्याचे गाव शोधत त्याला पकडून मुंबईत आणले.
बिनय नेपाल बाग (37) असे त्या आरोपीचे नाव असून तो शिवाजी पार्क परिसरातील एका सराफाकडे कामाला होता. तर वडाळा येथे भाडय़ाने रूम घेऊन राहत होता. बिनय उत्कृष्ट कारागीर असल्यामुळे घरमालकाने जानेवारी महिन्यात त्याला सहा तोळ्यांचा सोन्याचा हार आणि 45 हजार मजुरी देऊन नवीन सहा तोळ्याचा हार बनवून देण्यास सांगितले होते, पण तो जुना सोन्याचा हार आणि रोकड घेऊन बिनयने पोबारा केला. त्यामुळे त्याच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
वरिष्ठ निरीक्षक गायकवाड व निरीक्षक उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पंढरीनाथ कांदे तसेच महाडिक, केकान, संदिप शेलार, बाविस्कर पाटिल या पथकाने बिनयचा शोध सुरू केला. मात्र मध्येच लॉकडाऊन झाल्याने तपासात अडथळा येत होता. अखेर पोलिसांनी बिनयचा ठावठिकाणा शोधून त्याला पकडून आणले. कटाई या राहत्या गावी फसवून आणलेल्या ऐवजातून बिनयने स्टॉल टाकला होता.
























































