
सामना प्रतिनिधी । संगमेश्वर
संगमेश्वर नजीकच्या शिवने गावांत बिबट्यांची दहशत कायम असून गत एक महिन्यात तीन शेतकऱ्यांची जनावरे बिबट्यांनी मारल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भितीची छाया पसरली आहे. वन विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि शिवने गावांत बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी पिंजरा बसवावा अशी मागणी ग्रामपंचायतचे माजी सदस्य रवींद्र हळबे यांनी केली आहे.
शिवने या गावांत अधूनमधून ग्रामस्थांना बिबट्यांचे दर्शन घडण्याचे प्रकार घडत असतात. गत महिन्याभरात मात्र गावातील अनिल रसाळ , सोनू गोसावी आणि शिवराम गेल्ये या तीन शेतकऱ्यांच्या जनावरांचा गोठ्यात शिरुन फडशा पाडल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. याबाबत वन विभागाला कळविल्यानंतर त्यांच्या कडून आवश्यक ती दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांनी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गावांत सायंकाळ नंतर लोक घराबाहेर पडायला देखील घाबरत असून शिवने मार्गे उजगांव रस्त्यावर सायंकाळ नंतर बिबट्यांचा वावर असल्याने वाहनचालक यामार्गे जाण्याचे धाडस करत नाहीत.
सध्या शेतीचा हंगाम जोरात सुरु असून शिवने गावातील बारकोंबडा या ठिकाणाजवळ लावणीची कामे करणाऱ्या शिंदे , गेल्ये या शेतकरी कुटूंबाला भर पावसात सकाळी १० वाजता दोन बिबटे आणि दोन पिल्लांनी दर्शन दिले. या प्रकारामुळे शेतकरी कुटूंबाची अक्षरशः बोबडी वळली. शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबटे रानात पळून गेले. बिबट्यांच्या दर्शनाचे असे प्रकार शिवने गावांत सर्रास घडत असल्याने गावांत भितीची छाया पसरली आहे. वन विभागाने या सर्व प्रकारांची चौकशी करुन बिबट्यांनी जनावरे मारलेल्या तीनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच गावांत तातडीने पिंजरा बसवावा अशी मागणी ग्रामपंचायतचे माजी सदस्य रवींद्र हळबे यांनी केली आहे.


























































